शेऱ्याचीवाडी ता. फलटण येथे महिला शेतकऱ्यांनी घेतली कृषि योजनांची माहिती
फलटण - शेतीमाल आधारीत प्रक्रिया उद्योगाला चालना देणे तसेच महिला उद्योजकतेला प्रोत्साहन आणि डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन, परंपरागत कृषी विकास योजना, प्रधानमंत्री हवामान आधारित पीक विमा योजनेची माहिती देण्यासाठी शेऱ्याचीवाडी येथील महिला शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कृषि विभाग, ग्रामपंचायत शेऱ्याचीवाडी आणि प्रगती ग्रामसंघ शेऱ्याचीवाडी यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंडळ कृषि अधिकारी सतीश निंबाळकर यांनी उपस्थित महिला शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन व परंपरागत शेती विकास योजना विषयी सविस्तर माहिती दिली.
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजनेत स्वयंसहायता समुहांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पीक उत्पादनावरील खर्च कमी करून अधिकाधिक नफा मिळविण्यासाठी सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. एक रुपयात पीक विमा घेऊन प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री.निंबाळकर यांनी केले. कृषि पर्यवेक्षक राहुल कांबळे यांनी प्रधानमंत्री हवामानाधारित पीक विमा योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, विविध शेतीमाल प्रक्रियायुक्त उत्पादने व अर्थसहायाच्या शासकीय योजना फळ व कडधान्य प्रक्रिया, अल्प खर्चिक सेंद्रिय निविष्ठा निर्मिती विषयीही माहिती उपस्थित मान्यवरांनी दिली.
कार्यक्रमास फलटण उपविभागीय कृषि अधिकारी कैलास धुमाळ, फलटण तालुका कृषि अधिकारी सागर डांगे यांच्या मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास परिसरातील महिला शेतकरी मोठया संखेने उपस्थित होत्या.
No comments