पीएसआय परीक्षेत यश मिळवलेल्या तरुणांचा श्रीमंत संजीवराजे यांच्याकडून सन्मान
![]() |
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या समवेत पोलिस उप निरीक्षक म्हणून निवड झालेले तरुण |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासनात अधिकारी म्हणून दाखल होणारे तरुण हे आजच्या पिढीचे प्रेरणा स्त्रोत असल्याचे सांगत पदवी पर्यंतचे शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण केल्यानंतर जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पूर्ण करुन अधिकारी पदावर आरुढ होणाऱ्या तरुणांचा आदर्श घेऊन पदवीधर तरुणांनी आपली वाटचाल सुरु ठेवावी अशी अपेक्षा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
सन २०२० मध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून परीक्षा दिलेल्या फलटण तालुक्यातील तरुण/तरुणींची पोलिस उप निरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल त्यापैकी ९ पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा देताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ चेअरमन व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व गोविंदच्या संचालिका श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनीही या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आज बेरोजगार तरुणांची संख्या वाढत असताना संगणक प्रणालीच्या वापरामुळे केवळ तांत्रिक क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील तरुणांनी कुचंबना टाळण्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनतीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन प्रशासनात अधिकारी पदावर आरुढ व्हावे, असे सांगताना त्यासाठी कोणाच्या वशील्याची किंवा अन्य कसलीही आवश्यकता नसल्याने स्पर्धा परीक्षा हा अधिकारी पदासाठी उत्तम मार्ग असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
फलटण तालुक्यातील पोलिस उप निरीक्षक पदावर निवड झालेल्या सर्व तरुणांचा यथोचित सत्कार करुन अन्य तरुणांनी या तरुणांची प्रेरणा, आदर्श घ्यावा असे सांगत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या तरुणांना शुभेच्छा दिल्या.
फलटण शहर व तालुक्यात आणखी काही तरुण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलिस उप निरीक्षक पदावर आरुढ झाले असल्याचे समजते, मात्र सर्वांची माहिती उपलब्ध झाली नाही. उपलब्ध माहितीनुसार खालील ११ तरुण सिलेक्ट झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अजय सुनील मिसाळ फलटण, स्वप्नील हणमंत बनकर निंबळक, प्रशांतराज सोपानराव जाधव उपळवे, शंकेश्वर हणमंत अहीवळे फलटण, महेश बबन जगताप सुरवडी, सुवर्णा सागर लोंढे - गायकवाड मिरढे, विक्रम गोसाजी काळे मिरढे, मोहिनी जाधव मलठण, अनंत विठ्ठल हंकारे फलटण, सुप्रिया आढाव जावली, पूजा संजय मदने गिरवी.
No comments