Breaking News

बाप व मुलाचा १५ मिनिटांच्या फरकाने मृत्यू ; विषबाधा झाल्याचा संशय

Sudden death of father and son; Suspected poisoning

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ९ जुलै - फलटण शहरातील पोतेकर कुटुंबातील पिता-पूत्रांचा पंधरा मिनिटांच्या अंतराने आकस्मित मृत्यू झाला असून, अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान रात्री त्रास झाल्यामुळे दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल केले होते, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. 

    फलटण शहरातील नारळीबाग, गजानन चौक येथे हणमंतराव पोतेकर (वय ५५) हे एक मुलगा, मुलगी आणि पत्नी यांच्यासोबत राहत होते. हणमंतराव यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय होता. तसेच घराच्या बाहेर चहा विक्रीचे दुकान होते. त्यांचा मुलगा अमित (वय २८) हा पुणे येथे बँकेत नोकरीस असून, काल शनिवारी सकाळी अमित हा सुट्टी असल्याने घरी आला होता, त्यामुळे दुपारी मांसाहारी तर सायंकाळी गोड पुरण पोळ्यांचे जेवण घरात बनवण्यात आले होते. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आयुर्वेदिक काढा सर्वांनी पिला. यावेळी काढा पीत असताना हणमंतराव यांच्या मुलीला त्रास झाल्याने, तिने थोडाच काढा पिला.  काढा पिल्यानंतर हणमंतराव आणि अमित यांना त्रास होऊ लागल्याने, त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पहाटेच्या सुमारास दोघांचा पंधरा मिनिटाच्या अंतराने मृत्यू झाला. अन्नातून विषबाधेचा संशय व्यक्त होत असून, शव विच्छेदन झाल्यानंतर त्यांच्यावर दुपारी साडेतीनच्या सुमारास फलटण स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांचा व्हीसेरा राखून ठेवण्यात आला असून, येत्या आठ दिवसात त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

No comments