Breaking News

फलटणची आंबेडकरी चळवळ राज्यात मोठी - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Ambedkari movement of Phaltan was big in the state - Union Minister Ramdas recalled

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचे फलटण हे मोठे केंद्र असून, दलित पँथरच्या काळापासून, फलटणच्या तरुण कार्यकर्त्यांसह समाज बांधवांनी, चळवळीत नेहमी सक्रिय साथ दिल्यानेच आपण केंद्रीय मंत्री पदापर्यंत पोहचू शकल्याचे सांगतानाच कालकथित शंकर पवार यांच्या मुलास शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिले.

    कालकथीत शंकर पवार यांच्या फलटण येथे आयोजित शोकसभेत अध्यक्षस्थानावरुन ना. आठवले बोलत होते. यावेळी कालकथीत शंकर पवार यांच्या कुटुंबियांसह, दत्ता अहिवळे, विजय येवले, मधुकर काकडे, संजय निकाळजे, मुन्ना शेख, राजू मारुडा, सतिष अहिवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

    कालकथीत शंकर पवार यांच्या सारख्या विविध समाजातील निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी उभी राहिल्याने, पँथरचा झंझावात महाराष्ट्रासह अन्य राज्यात पोहचला असल्याचे निदर्शनास आणून देत, ८० - ९० च्या दशकात आपण अनेक कार्यक्रमांसाठी नेहमी फलटण येथे येत असे. केंद्रीय मंत्रीपदाच्या माध्यमातून लक्षावधी व्यक्ती अन संस्थांची कामे करता आली. समाज प्रचंड मोठा असल्याने आणि देशभर रिपब्लिकन चळवळ विस्तारल्यामुळे सर्वच ठिकाणी पोहचता येत नाही, तथापि सामुदाईक पातळीवरील कोणतेही काम असले अन कार्यकर्त्यांनी, तरुणांनी चिकाटीने पाठपुरावा केला तर नक्की मोठी कामे उभी राहतील याची ग्वाही यावेळी ना. आठवले यांनी दिली.

    शोकसभेचे नियोजन व व्यवस्था रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया फलटण शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी / कार्यकर्ते सर्वश्री विजय येवले, मधुकर काकडे, संजय निकाळजे, मुन्ना शेख, राजू मारुडा, सतिष अहिवळे, तेजस काकडे, मारूती मोहिते, अभिलाश काकडे, प्रविण शेळके, विमलताई काकडे, राखीताई कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.

No comments