Breaking News

लंम्पी चर्म रोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या बाजारावर व वाहतुकीवर बंदी

Ban on animal markets and transport in the wake of Lumpy skin disease outbreak

    सातारा - गोवर्गीय जनावरांमध्ये सांगली, कोल्हापूर व सोलापूर  या शेजारील जिल्हयात लंम्पी चर्म रोग प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आढळून येत आहे. तसेच सातारा जिल्हयातील कराड व फलटण तालुक्यात तुरळक ठिकाणी लंम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव सुरु आहे या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हयातील सर्व गोवर्गीय बाजार तसेच गोवर्गीय जनावरांच्या  वाहतुकीवर पुर्ण बंदी घालण्यात आली आहे याबाबतचे  आदेश प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी नुकतेच निर्गमित केले आहेत.  

    या आदेशानुसार  जिल्ह्यातील आठवडा बाजारात गोवर्गीय जनावरांची खरेदी, विक्री तसेच गोवर्गीय जनावरांची वाहतूक करणेत येवू नये. जनावरांचे प्रदर्शन, यात्रा, तसेच बैलगाडा शर्यतीचे आयोजन पुढील आदेश होईपर्यंत करणेत येऊ नये.

    फलटण, कराड, कोरेगाव व माण या तालुक्यातील 9 गावांमध्ये लंम्पी चर्म रोगाची लागण झाली आहे. यामध्ये 26 गाय व 15  बैल असे एकूण 41 जनावरांना लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर एका जनावराचा मृत्यु झाला असून 3 जनावरे नियमित औषधाने बरी झाली आहेत.

    जिल्हयातील एकूण 3 लाख 52 हजार 436 गोवर्गीय जनावरांपैकी 3 लाख 23 हजार 67  जनावरांचे लंम्पी चर्म रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले असून उर्वरित जनावरांची लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. सर्व पशुपालकांनी आपल्या गोवर्गीय जनावरांना लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन करणेत येत आहे. रोग प्रादुर्भाव टाळयासाठी  पशुपालकांनी आपले जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवावेत व वरचेवर गोचीडनाशक औषध फवारणी करावी जनावरांमध्ये आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैदयकीय दवाखान्यात संपर्क साधून उपचार करुन घ्यावेत. गावात जनावरांमध्ये रोग प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने किटकनाशक औषध फवारनी वरचेवर करावी असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विजय सावंत केले आहे.

No comments