महसूल सप्ताहात फलटण प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम : शहीद जवानांच्या कुटुंबियांना जमिनीचे वाटप
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : देश देशसेवेसाठी हुतात्मा झालेल्या भारतीय सैन्य दलातील सशस्त्र जवानांचे योगदान कधीही न विसरता येणारे असून महसूल सप्ताहातील सैनिकहो तुमच्यासाठी कार्यक्रम वारसांना जमीन वाटपाचे आदेश निर्गमित करत असल्याचा विशेष आनंद होत असल्याचे प्रतिपादन फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले.
महाराष्ट्र शासनाकडून राज्यात १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि ५ ऑगस्ट रोजी ज्या शूर जवानांनी देश रक्षणासाठी प्राणाची बाजी लावून देश सेवा केली अशा जवानांच्या सन्मानार्थ सैनिकहो तुमच्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन राज्यभरात करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने तहसील कार्यालय येथे प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार अभिजीत जाधव व नायब तहसीलदार बोबडे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील वीर पत्नी व माता श्रीमती विजया माणिकराव देशमुख (रा. भवानीनगर, राजुरी, ता. फलटण), वैशाली रवींद्र धनावडे (रा. मोहाट, ता. जावली), पुष्पलता काशिनाथ मोरे, (रा. आदित्यनगरी, सातारा), श्रीमती मंदाकिनी सुनील कचरे, (रा. सालपे, ता. फलटण) यांना प्रत्येकी २ हेक्टर जमीन वाटपाचे आदेश निर्गमित करण्यात आले.
हुतात्मा झालेल्या भारतीय सैन्य दलातील सशस्त्र जवानांच्या वारस वीरपत्नी, वीरमाता यांना सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व निवासी जिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्या कार्यतत्परतेमुळे अवघ्या आठ दिवसात दाखल कागदपत्रांवर जलद कार्यवाही कार्यवाही करत महसूल सप्ताहातील सैनिकहो तुमच्यासाठी कार्यक्रमादिनी वारसांना जमीन वाटपाचे आदेश निर्गमित करत असल्याचा विशेष आनंद आहे. असे यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
फलटण उपविभागीय अधिकारी म्हणून अवघ्या एक महिन्यापूर्वी पदावर रुजू झालेल्या सचिन ढोले यांनी मागील बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या हतात्मा जवानांच्या वारसांना जमीन वाटपाच्या प्रश्नात व्यक्तिशः लक्ष घालून अवघ्या आठ दिवसात याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी आणून आज या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने शहीद जवानांच्या नातलकांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे मनोगतामध्ये विशेष आभार मानले यावेळी हुतात्मा जवानांचे कुटुंबीय व नागरिक उपस्थित होते.
No comments