Breaking News

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पुणे विभागस्तरीय पुरस्कार जाहीर ; सातारा जिल्ह्यातील बनवडी ग्रामपंचायतीला विभागात प्रथम

Pune divisional level award announced under Sant Gadgebaba Gram Swachhta Abhiyan; Banwadi Gram Panchayat of Satara district first in the division

     पुणे - स्वच्छतेच्या सवयी अंगीकारुन ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्याच्या उद्देशाने राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत सन २०२०-२१  व २०२१-२२ या दोन वर्षाचे विभागस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील बनवडी (ता.कराड) ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

    संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत विभागीय आयुक्त श्री. राव यांच्या अध्यक्षतेखालील विभागस्तरीय समितीने नुकतीच विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक मिळालेल्या ग्रामपंचायतींची तपासणी  केली. या समितीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता श्री.राहणे, पुणे विभागाचे माहिती  उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, विकास शाखेच्या सहाय्यक आयुक्त सोनाली घुले आणि विकास शाखेचे उपायुक्त विजय मुळीक यांचा समावेश होता. समितीने केलेल्या पडताळणीनुसार विभागस्तरीय पारितोषिकासाठी पुढीलप्रमाणे ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत-

    


सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीला विभागस्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर झाला असून बक्षीसाची रक्कम रुपये दहा लाख आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात आजरा तालुक्यातील वाटंगी आणि पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील काळेवाडी ग्रामपंचायतींना ८ लाख रुपयांच्या द्वितीय पुरस्कार विभागून जाहीर करण्यात आला असून  सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे आणि खंबाळे ग्रामपंचायतींना तृतीय क्रमांकाचा ६ लाखांचा पुरस्कार विभागून जाहीर करण्यात आला आहे.

    बनवडी ग्रामपंचायतीला स्व.वसंतराव नाईक पुरस्कार,  वाटंगी ग्रामपंचायतीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार तसेच सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतीला स्व.आबासाहेब खेडेकर  असे प्रत्येकी तीस हजार रुपये रक्कमेचे विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

    स्वच्छतेशी आणि ग्रामविकासाशी निगडीत क्षेत्रामध्ये भरीव काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर पुरस्कार देण्यात येतात. या अभियानांतर्गत पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घर, गाव व परिसर स्वच्छता, वैयक्तीक स्वच्छता व लोकसहभाग आणि वैयक्तीक व सामुहिक पुढाकारातून विकासासाठी राबविण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आदी बाबींची तपासणीच्या आधारे गुणांकन करण्यात येते. विभागस्तरावरील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायती राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरतात.

No comments