Breaking News

चायनीज मांजा न वापरण्याचे सामाजिक संघटनांचे आवाहन

चायनीज मांजाने कापला गेलेला पीव्हीसी पाइप
Social organizations call for non-use of Chinese Manja

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - : प्रतिवर्षी नागपंचमी आली की पतंग हा परंपरागत खेळ सुरु होतो पण अलीकडे त्यामध्ये आलेला चायनीज मांजा जीवघेणा ठरत असताना, त्याचा वापर वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे, भितीचे वातावरण निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तरुणांनी चायनीज मांजा न वापरता हा परंपरागत खेळ वृध्दींगत करावा अशी अपेक्षा अनेक सामाजिक संघटनांनी व्यक्त केली आहे.

    शासनाने चायनीज मांजा वापरावर कडक निर्बंध घातले आहेत, तरीही विशेषत: पतंग स्पर्धेसाठी चायनीज मांजा वापरण्याकडे वाढत असलेला ओढा अनेकांच्या  जिवीताला धोका पोहोचवत असल्याने स्पर्धा किंवा सहज म्हणूनही पतंग उडविणाऱ्या सर्वांनी यापुढे चायनीज मांजा न वापरण्याचा निर्धार करावा आणि समाज मनावरील भितीचे सावट दूर करावे असे आवाहन या सामाजिक संघटनांनी केले आहे.

    फलटण शहरात दुचाकी वरुन घराकडे परतणारे दोन तरुण नुकतेच जबर जखमी झाले असून ही घटना ताजी असतानाच अजिंक्य हाईट्स, स्वामी विवेकानंदनगर, फलटण येथील टेरेसवर  उभा असलेला पीव्हीसी पाईप चायनीज मांजाने कापला गेला आहे, यावरुन चायनीज मांजाची धार, दाहकता किती असेल हे कल्पनेच्या पलीकडचे असून याचा बंदोबस्त पोलिस यंत्रणेने केला पाहिजे अशी भावना फलटण करांमधून व्यक्त होत आहे.

    याच पद्धतीने घरावर असलेल्या वीज वाहक वायर्स मांजाने कापल्या गेल्या तर त्याची कल्पना नसल्याने मोठा अनर्थ घडू शकतो याची नोंद घेऊन चायनीज मांजा न वापरण्याचा निर्धार फलटणकरांनी करावा, त्याच बरोबर पोलिस यंत्रणेने योग्य खबरदारी घ्यावी अशी मागणी होत आहे.

No comments