ज्ञानाची कवाडे सर्वसामान्यांसाठी खुली करणारे सुभाषकाका
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांचा जन्म शेतकरी कुटूंबामध्ये झाला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. कै. नानांनी श्रीराम एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. नानांच्या नंतर संस्थेची धुरा सुभाषकाकांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळली. संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी सुभाषकाकांनी कष्ट घेतले आहेत. फलटण शहरातील, तालुक्यातील सर्व थरातल्या लोकांना सुभाषकाका आपलेसे वाटत होते. सुभाषकाकांचा समाजातील सर्व घटकांशी स्नेह होता. गोरगरीबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. गुणी माणसांचा आदर करणारे आणि आपल्या भोवती नेहमी सर्वसामान्यांची मंदियाळी असणारे सर्व गुणसंपन्न व्यक्तीमत्व म्हणजे सुभाषकाका.
श्रीराम एज्युकेशन सोसायटीची भव्य वास्तू, प्रशस्त परिसर, रम्य निसर्ग, निसर्गाच्या वरदानाला कतृत्वमान सुभाषकाकांच्या कल्पकतेच्या दृष्टीकोणाच्या योगदानाची लाभलेली साथ, यामुळे या संस्थेचे वटवृक्षात रुपांतर झालेले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी, फलटण व फलटण परीसरात प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शैक्षणिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. फलटण तालुका व परिसरातील पहिले औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय (डी. फार्मसी) सुरु करुन वैद्यकिय शिक्षणामध्ये पहिले पाऊल ठेवले आहे. या सर्व सुविधा त्यांनी आपल्या संस्थेमध्ये राबवून उच्च ज्ञानाची कवाडे सर्वसामान्यांसाठी खुली केली.
'देणाऱ्याने देत जावे,
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
'देणाऱ्याचे हात घ्यावे'
No comments