फलटण एसटी डेपो बुकींग अपहार प्रकरणी सहाय्यक वाहतूक अधीक्षक निलंबित
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - अष्टविनायक यात्रेतील चार एसटी गाड्या बुकींग मध्ये झालेल्या अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचा रुपयांच्या अपहार प्रकरणी राजेंद्र वाडेकर सहाय्यक वाहतूक अधीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी एसटी विभाग नियंत्रक पलंगे यांनी तत्काळ पाठपुरावा करत सदरची निलंबनाची कारवाई केली आहे.
अष्टविनायक यात्रेसाठी फलटण तालुक्यातील महिलांनी बुकींग केलेल्या चार गाड्याची रक्कम राजेंद्र वाडेकर साहाय्यक वाहतूक अधीक्षक यांनी स्वतः वापरली असल्याचे पुढे आले आहे. महिलांकडून ऑनलाईन वरून स्वतःच्या खात्यावर पैसे जमा करून घेतल्याची बाब भरारी पथकाने चार एसटी गाड्या तपासणी करताना उघड झाली होती. प्रत्येकी गाड्यातील ४० ते ४२ सीट चे एकूण १६८ सिटचे ९०० रुपये प्रमाणे अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचा अपहार राजेंद्र वाडेकर यांनी केल्याचे पुढे आले. संबधित प्रवासी महिलांना बुकिंग तिकीटे न दिल्याची व एसटी खात्यावर पैसे भरले नसल्याची माहिती पथकास मिळताच, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फलटण डेपोची चौकशी केली. दैंनदिन खात्यात रोखपाल यांच्याकडे चौकशी केली असता अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचा घोटाळा झाला असल्याची बाब समोर आली. या प्रकरणी राजेंद्र वाडेकर साहाय्यक वाहतूक अधीक्षक यांच्यावर दिनांक १४ रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत वासंती जगदाळे आगार व्यवस्थापक यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये व एसटी विभाग नियंत्रक पलंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ९ रोजी फलटण आगारातून अष्टविनायक दर्शन करीता ४ जादा बसेस सोडण्यात आलेल्या होत्या. सदर बसेस या प्रवाशी ग्रुप बुकिंग नुसार पाठविल्या जातात, परंतू एकाच वेळेस एकाच गावातील/ठिकाणा वरील ४०/४२ प्रवाशांचा ग्रुप उपलब्ध न झाल्याने जसे प्रवाशी उपलब्ध होतील तसे प्रवाशांचे बसचे सीट निश्चित करण्याची जबाबदारी रा.का. वाडेकर सहाय्यक वाहतुक अधिक्षक यांचेकडे होती. वाडेकर यांनी दिनांक ९ रोजीच्या अष्टविनायक दर्शनच्या ४ बसेस च्या प्रवाशांच्या प्रवास भाडयापोटी त्यांच्याकडे जमा झालेली रक्कम त्याच दिवशी रा.प. खात्याकडे त्वरीत जमा करणे आवश्यक होते. परंतू त्यांनी तसे न करता जमा झालेली रक्कम त्यांच्याकडेच ठेवली. वाडेकर यांनी त्यांचेकडे जमा झालेली प्रवाशांच्या प्रवास भाडयाची रक्कम रा.प. महामंडळाकडे तात्काळ भरणा न करता स्वत:जवळ ठेवल्याने त्यांचेवर रा.प. रक्कमेचा तात्पुरता अपहार केले प्रकरणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत खाते निहाय चौकशी करुन निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे अशी माहिती दिली आहे.
No comments