फलटण येथे मराठा क्रांती मोर्चाकडून चक्काजाम आंदोलन ; आरक्षण द्या! अन्यथा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - जालना येथे उपोषणास बसलेल्या मराठा आंदोलकांवर लाठीमार केल्याच्या निषेधार्थ व ओबीसी मधुन ५०% आरक्षण मिळण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने आज सोमवार दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत क्रांतिसिंह नाना पाटील चौक, फलटण येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शासनाने मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे अन्यथा, २०२४ च्या निवडणुकीत मराठी हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला.
मराठा बांधवांनी आपली मनोगते व्यक्त केली, त्यामध्ये, जालना येथे शांततेत उपोषण चालू असताना, या शासनाला कोणती बुध्दी सुचली आणि त्यांनी, आरक्षण देण्याऐवजी मराठा बंधावावर लाठीचार्ज केला, ही घटना निंदनीय आहे. जर शासनाने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण दिले नाही तर, येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत मराठी हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, कारण आता आमचा अंत झाला आहे असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला.
आजपर्यंत विविध राज्यकर्त्यांना आपण निवडून दिले आहे, तरीसुद्धा कुणीही मराठा आरक्षण आपल्याला देऊ शकले नाही. राज्यामध्ये जास्तीत जास्त आमदार व खासदार हे मराठा आहेत. तरी सुद्धा कोणीही मराठा आरक्षणावर ठोस पावले उचलण्यास तयार नाही. यापुढे कोणताही राजकीय पक्ष म्हणून नाही तर मराठा म्हणून आपण एकत्र आले पाहिजे. यापुढे कोणत्याही ठिकाणांहून आपल्याला कोणत्याही मराठा बांधवानी हाक दिली तर मराठा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. ह्या राज्यकर्त्यांनी मराठा समाजाचा अंत पाहू नये; असे सुद्धा यावेळी मत व्यक्त केले गेले.
No comments