धुमाळवाडी राज्यातील पहिले फळांचे गाव
सातारा - फलटण तालुक्यातील धुमाळवाडी हे गाव राज्यातील पहिले फळांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. कृषि आयुक्त सुनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत मेगा फूड पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.
फळांचे गाव म्हणून घोषित झाल्याबद्दल कृषि आयुक्त श्री.चव्हाण यांनी गावातील शेतकऱ्यांचे अभिवंदन केले.
धुमाळवाडी गावात शेतक-यांनी १९ विविध प्रकारची फळबाग लागवड केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पेरु, सिताफळ, डाळींब, आवळा, चिंच, अंजिर, केळी, जांभुळ, ड्रॅगणफ्रुट, द्राक्षे, चिकू, लिंबू, संत्रा, बोर नारळ, आंबा, पपई अशा विविध फळांचा समावेश सलग लागवडीमध्ये आहे. तसेच बांधावरती सफरचंद, स्टार फ्रुट, लिची, काजू, फणस, करवंद, खजुर या फळ झाडाची लागवड केली आहे.
ही फळबाग लागवड रोजगार हमी योजनातंर्गत फळबाग लागवड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत तसेच काही शेतक-यांनी स्वतःहून लागवड केली आहे.
कृषि विभागाच्या विविध मेळावे, प्रशिक्षण, मार्गदर्शनांखाली फळबाग लागवड क्षेत्र वाढीसाठी मदत झाली तसेच शेतक-यांनी फळबाग लागवड करावी म्हणून विविध उपक्रम सुरु केले. या फळबागामुळे फळांचे उत्पादन त्याचबरोबर फळप्रक्रिया उदयोग, फळांची निर्यात मध्ये गावाची प्रगती दिवसेंदिवस झपाटयाने होत आहे.
कृषि विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतक-यांनी उत्पादीत फळांचे गावातच प्रक्रिया करुन विक्री व्यवस्थापन करण्यासाठी तसेच फळप्रक्रिया उदयोगाचे जाळे विस्तारण्यासाठी या गावातील शेतक-यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ देऊन नवउदयोजक तयार करण्यासाठी प्रयत्न चालु आहेत.
No comments