मैत्रिणीच्या नवऱ्याने लावली बेडरूमला आग ; कोळकी, फलटण येथील घटना
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ - मैत्रिणीच्या नवऱ्याने घराची कडी तोडून, घरात प्रवेश करून, बेडरुमला आग लावल्याची घटना कोळकी ता. फलटण येथे घडली असून, या आगीमध्ये गृहउपयोगी वस्तु, महत्वाची कागदपत्रे व रोख रक्कम ५६ हजार रुपये जळाले आहेत. या प्रकरणी मैत्रिणीच्या नवऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सौ. राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता, मालोजीनगर, कोळकी येथील, मैत्रीण सौ. राठोड यांच्याकडे गेल्या होत्या. त्यावेळी मैत्रिणीचे पती गजानन संतोष राठोड मुळ रा. निंबायती न्हावी तांडा ता. सोयगाव जि. औरंगाबाद, सध्या रा. मालोजीनगर कोळकी ता. फलटण याचा, त्याच्या पत्नीसोबत वाद सुरू होता, यामध्ये राठोड याने त्याच्या पत्नीला मारहाण करून, घरातील साहित्याची मोडतोड करुन साहित्य अस्ताव्यस्त टाकले व मैत्रिण सौ. राठोड हिला मारहाण करुन घरातुन निघुन गेला. त्यानंतर, सौ. राऊत व त्यांची मैत्रिण सौ. राठोड दोघी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास, सौ. राऊत यांच्या घरी आल्या. त्यावेळी सौ. राऊत यांच्या घरातुन मैत्रिण सौ. राठोड हिचा नवरा गजानन संतोष राठोड हा, हॉलच्या दरवाज्यातुन बाहेर आलेला दिसला व तो लगेच तेथुन निघुन गेला. त्यानंतर सौ. राऊत यांनी पाहिले असता, त्यांना हॉलचे दरवाजाची आतील कडी तोडलेली दिसली. त्यानंतर सौ. राऊत घरात गेल्या. त्यावेळी सौ. राऊत यांना बेडरुमच्या खोलीत आग लागलेली दिसली. म्हणुन सौ. राऊत यांनी आरडा ओरडा केला. ओरडण्याचे आवाजाने शेजारील लोक जमा झाले व त्यांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तेथे जमलेल्या लोकांपैकी कोणीतरी अग्नीशामक ऑफिसला फोन करुन अग्नीशामक दलाची गाडी बोलवुन लागलेली आग विझवली. आगीमध्ये गृहउपयोगी वस्तु सर्व कागपत्रे, रोख रक्कम ५६ हजार रुपये जळाले असल्याची फिर्याद सौ. राऊत यांनी दिली आहे.
No comments