गणेश विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेेराद्वारे राहणार पोलिसांचे लक्ष
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - : गणेश विसर्जन मिरवणुका सुरक्षीत व शांततेत पार पाडण्यासाठी फलटण नगर परिषद, वीज वितरण कंपनी, पोलिस यंत्रणा नियोजन पूर्वक कार्यरत असून त्यासाठी शहरातील जुनी बंद असलेली सी.सी.टी.व्ही. यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून वीज वितरण कंपनीने अखंडित वीज पुरवठ्यासाठी आवश्यक खबरदारी घेतल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी सांगितले.
उद्या गुरुवार दि. २८ सप्टेंबर रोजी शहर व तालुक्यातील सुमारे ५०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन परंपरागत मार्गाने नीरा उजवा कालवा अथवा नेहमीच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागात त्यांच्या नियोजित ठिकाणी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत उप विभागीय पोलिस अधिकारी राहुल धस बोलत होते. यावेळी तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड, वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते, शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुनील शेळके, नगर परिषद शहर अभियंता कुंभार, संगणक अभियंता निखिल अवघडे उपस्थित होते.
फलटण शहर व तालुक्यात गौरी गणपती उत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात शांततेत पार पाडण्यात सर्वांच्या सहकार्याने यश आले असून आता गणेश विसर्जन मिरवणुका सुरक्षीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, फलटण नगर परिषद, वीज वितरण कंपनी आणि पोलिस यंत्रणा आवश्यक ती सर्व खबरदारी घेत असून फलटण शहर व तालुक्यातील नागरिकांनी सर्व नियम, निकष सांभाळावेत असे आवाहन उप विभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी केले आहे.
फलटण शहरात कायदा सुव्यवस्था परिस्थिती नियंत्रण, गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक नियंत्रण, शहरातील छोट्या मोठ्या चोऱ्या दरोडे यावर लक्ष ठेवून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश चोपडे, शहरातील व्यापारी आणि पत्रकार यांच्या संयुक्त सहभागाने फलटण शहरात सन २०१५ मध्ये बसविण्यात आलेली सी.सी.टी.व्ही. यंत्रणा बंद पडली होती तिचे पुनरुज्जीवन नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तम प्रकारे केले असून आज रोजी सदर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत त्यासाठी शहर पोलिस ठाणे आणि नगर परिषद येथे नियंत्रण कक्ष उभारण्यात आल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी निदर्शनास आणून दिले.
वीज वितरण कंपनीने अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते यांनी आपले सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने विसर्जन मिरवणूक मार्गावरील संपूर्ण वीज पुरवठा अखंडित सुरु राहील, तसेच सर्व हायमास्ट दिवे सुरु राहतील यासाठी विशेष मेहनत घेतल्याचे नमूद करीत आता विसर्जन मिरवणूक मार्गावर प्रकाश व्यवस्था सुरळीत राहील याची ग्वाही उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी दिली आहे.
गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील ज्या वीज वाहिन्या अडचणीच्या ठरत होत्या त्या बाजूला करण्यात आल्या आहेत, काहींची उंची वाढविली असून जेथे उंची वाढविणे शक्य नाही त्या वीज वाहिन्या मिरवणूक काळात बंद ठेवण्यात येणार आहेत, तरीही मिरवणूक मार्गावर वीज वितरण कंपनीचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित राहणार आहेत त्यांच्याही संपर्काशिवाय कोणीही वीज वाहिन्या, वीजेचे खांब, वीज खांबाचे ताण, रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर), भूमिगत वीज वाहिन्या, त्यांचे फिडर यांना कोणीही स्पर्श करु नये, त्यावर उभा राहू नये असे आवाहन वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते यांनी केले आहे.
मिरवणुकीत धातूच्या रॉड असलेल्या झेंड्याचा वापर करु नका, वीज वाहक तारांना, वीज वाहिन्यांना स्पर्श होणार नाही, डिजिटल फ्रेम, कमानी उभारताना, काढताना काळजी घ्या असे आवाहन अतिरिक्त कार्यकारी अभियंता देवकाते यांनी केले आहे.
संपूर्ण मिरवणूक मार्ग आणि विसर्जन ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त नियुक्त करण्यात येत असून त्याशिवाय फिरती पोलिस पथके, पोलिस वाहनांतून पेट्रोलिंग सुरु राहणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
No comments