पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिलह्यातील विकास कामांचा आढावा ; कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याच्या केल्या सूचना
सातारा - पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जलसंपदा, जलसंधारण व विद्युत विभागांतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा घेऊन ही कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डूड, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, महावितरणचे अधीक्षक अभियंता हनुमंत ढोक यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.
विद्युत विभागाचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, एकही घर विद्युत जोडणी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच नियमानुसार शेतकऱ्यांच्या शेतीपंपाना विद्युत जोडणीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.
जिल्ह्यातील धरणाची, उपसा सिंचन योजनेची कामांना निधी उपलब्ध आहे. ती कामे लवकरात लवकर करावीत. ज्या धरणांच्या कामांचे प्रस्ताव मंत्रालयस्तरावर आहेत त्याची माहिती द्यावी. त्या कामांबाबत पाठपुरावा करुन मंजुरीसाठी प्रयत्न केले जातील, असे जलसंपदा विभागाचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
डोंगरी भागातील बंधारे नादुरस्त आहेत अशा बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची मोहिम हाती घ्यावी. तालुकानिहाय शाखा अभियंत्यांना उद्दिष्ट द्यावे. पुढील वर्षी होणाऱ्या पावसामुळे हे बंधारे 100 टक्के भरतील अशा पद्धतीने नियोजन करावे. यासाठी निधी दिला जाईल, असे जलसंधाण कामाचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
No comments