Breaking News

पुसेसावळी घटनेचा आधार घेऊन जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न केला तर फलटणमध्येही पोलीस ॲक्शन मोडवर येणार ; कडक कारवाई होणार - डीवायएसपी राहुल धस

If an attempt is made to incite communal feelings on the basis of the Pusesawali incident, the police will be on action mode in Phaltan too; Strict action will be taken - DySP Rahul Dhas

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ - पुसेसावळी घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जमाबंदीचे आदेश लागू असून, ते येत्या शुक्रवार पर्यंत पारित करण्यात आले आहेत, त्याप्रमाणे फलटण शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, परंतु फलटण शहरात शांतता असल्यामुळे आपण जास्त कुणाला हटकले नाही, सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत, त्यामुळे आम्ही जास्त कठोर भूमिका घेतली नाही, परंतु जर आमच्या निदर्शनास आले कुठेतरी पाच सहा जण जमाव करून, पुसेसावळी घटनेचा आधार घेऊन, जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न करतायत,  तर पोलिसांना संरक्षकाच्या भूमिकेतून बाहेर येऊन, ऍक्शनच्या भुमिकेत जावे लागेल आणि त्यावेळी पोलीस कडक कारवाई करणार हे लक्षात असू द्या. जो कोणी या शांततेला धक्का लावण्याचे काम करेल, त्याच्यावर पोलीस प्रशासन कडक कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांनी दिला.

    पुसेसावळी येथील दुदैवी घटनेच्या अनुषंगाने फलटण तालुक्यात सर्वत्र शांतता असावी व प्रशासन व नागरिकांच्या संवाद असावा या हेतूने महसूल व पोलीस प्रशासनाच्या वतीने आज सर्व धर्मातील नागरिकांची मीटिंग बोलवण्यात आली होती. या मिटींगला पोलीस उपाधीक्षक राहुल धस, तहसीलदार अभिजीत जाधव, पोलीस निरीक्षक सुनील शेळके, शुक्रवार पेठ गणेशोत्सव मंडळळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच शुक्रवार पेठ येथील माजी नगरसेवक यांच्यासह शुक्रवार पेठ येथील ज्येष्ठ व तरुण कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

     पुसेसावळी येथील घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी घडली असली तरी सर्वत्र तणावाचे वातावरण होते, परंतु फलटण शहरातील तमाम  नागरिकांचे अभिनंदन करावेसे वाटते, कारण आपल्या जिल्ह्यात एवढी मोठी घटना घडूनही, सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी संयम बाळगत, कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम केलं आहे, त्यामुळे मी  फलटण मधील नागरिकांचे अभिनंदन करतो असे प्रतिपादन पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांनी शुक्रवार पेठ येथे केले.

    इंटरनेट ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी चुकीची माहिती, अफवा  सोशल मीडियाच्या द्वारे प्रसारित होण्याची शक्यता आहे, प्रत्येक समाजामध्ये ९९% लोकं ही शांतताप्रिय  असतात, परंतु त्यामधील एखादा टक्का लोक, हे समाज विघातक कृती करत असतात, त्यांना शांत वातावरण बिघडवायचे असते, त्यामुळे ते अशा अफवा व चुकीच्या बातम्या पसरवत असतात आणि याचे परिणाम पूर्ण समाजाला व इतर नागरिकाला भोगावे लागत असतात, त्यामुळे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की, अशा प्रकारची अफवा व चुकीची पोस्ट जर आपल्या निदर्शनास आली, तर ती आपण फॉरवर्ड करू नका, त्याला लाईक करू नका त्याला डिसलाईट देखील करू नका,  आमच्याशी त्वरित संपर्क साधा, आपण एक सोशल मीडिया कमिटी स्थापन केलेली आहे, त्यामध्ये प्रत्येक समाजाचा एक नागरिक व तसेच पत्रकार यांचा समावेश आहे, जर अशा प्रकारची पोस्ट, अफवा प्रसारित झाली तर, ती प्रथम या समितीद्वारे त्याची चाचणी करून, शहानिशा करून त्यानंतर कमिटी निर्णय घेईल व नंतर गुन्हे दाखल करण्यात येतील, एखाद्या व्यक्तीने भावनेच्या भरात पोस्ट व्हायरल केली तर त्याचा निर्णय समाजाने घ्यावा, याकरिता आपण ही कमिटी निर्माण केली आहे. त्या कमिटीच्या माध्यमातून आपण शांतता राखण्याचा देखील प्रयत्न करत आहोत, सामाजिक पातळीवर हा विषय मिटवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांनी सांगितले.

    एखादी व्यक्ती अफवा पसरवत आहे, चुकीचे वक्तव्य करत आहे  किंवा सोशल मीडियावर चुकीची पोस्ट, स्टेटस ठेवत असल्याचे निदर्शनास आले तर तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, कायदा कोणीही हातात घेऊ नये, तसेच स्वतः देखील अफवा किंवा चुकीच्या पोस्ट पसरवू नका, जर असे आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल,  असे तहसीलदार अभिजीत जाधव यांनी सांगितले.

    सोशल मीडियावर पोस्ट प्रसारित करताना, ती खरी आहे का खोटी,  हे जाणून घ्यावे, सोशल मीडियावर आलेल्या पोस्टची सत्यता पडताळूनच ती फॉरवर्ड करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांनी केले. इंटरनेट सुरू झाल्यानंतर अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल होऊ शकतात, तरी त्यावर विश्वास न ठेवता आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांनी केले.

     अशा दंगल सदृश्य घटना घडल्यानंतर सोशल मीडिया अकाउंट हॅक करून त्याद्वारे जातीय भावना दुखवणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या जातात या गोष्टीकडे लक्ष वेधून, यावर पोलीस प्रशासनाने नजर ठेवावी अशी मागणी भाऊ कापसे यांनी केली.

    शुक्रवार पेठेतील गणेशोत्सव मंडळ हे फार जुने असून, या मंडळात मुस्लिम समाजाच्या युवकांचाही सहभाग  असतो,  शुक्रवार पेठ व फलटण येथे हिंदू मुस्लिम ऐक्य जास्त असून, ते सर्व फलटण शहरातील  शांतता टिकवण्याचे काम करत असल्याचे सादिकभाई बागवान यांनी यावेळी स्पष्ट केले.

No comments