Breaking News

इज्राईली शास्त्रज्ञ कास पठारामुळे मंत्रमुग्ध

Israeli scientists fascinated by the Kas Plateau

    सातारा - विख्यात इज्राईली वनस्पतिशात्रज्ञ, वैज्ञानिक आणि सुप्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. श्रीमती मिखाल याकीर यांनी सुप्रसिद्ध अशा कास पुष्प पठारास तसेच साताऱ्यातील डॉ. अजित कुलकर्णी यांच्या होमिओपेथिक क्लिनिकला नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्यांच्या सोबत त्यांच्या सहाय्यक गिली मोअर याही होत्या.

    डॉ. श्रीमती याकीर या डॉ. अजित कुलकर्णी यांच्या दृढ स्नेही असून त्या वरचेवर डॉ. कुलकर्णी यांच्या सातारा आणि पुण्यातील क्लिनिकला भेट देत असतात. या भेटीतून डॉ. कुलकर्णी यांच्या वैशिष्ट्यपूर्ण केसेस त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. डॉ. कुलकर्णी यांनी साताऱ्यातील राधिका पैलेस येथे नुकतेच एक होमियोपैथीवरील विचारमंथन शिबीर आयोजित केले होते. त्यात डॉ. याकीर  यांनी आपल्या विद्वत्तापूर्ण व्याख्यानातून अत्यंत उद्बोधक असे मार्गदर्शन उपस्थित डॉक्टरांना केले. या व्याख्यानात डॉ. याकीर यांनी पंचमहाभूते, वनस्पती विकासाचे टप्पे आणि प्रकिया तसेच या दोहोंचा होमियोपैथी चिकित्साशास्त्राशी असलेला अन्योन्य संबंध याबद्दल मौलिक विवेचन केले. याच शिबिरात डॉ. याकीर यांच्या हस्ते डॉ. अजित कुलकर्णी यांनी लिहिलेल्या " Harmony In Totality - Vol - २ " या १००० हुन अधिक पृष्ठाच्या होमियोपैथीवरील नवीन अभ्यासपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन झाले.

    साताऱ्यातील वास्तव्यात श्रीमती याकीर आणि श्रीमती मोअर यांनी जगप्रसिद्ध अशा कास पठार आणि ठोसेघर धबधब्यासोबत कुमुदिनी सरोवरासही भेट दिली. येथील विविधरंगी पुष्पांचे सौन्दर्य, प्रसन्न, शुद्ध तसेच आल्हाददायक वातावरण अनुभवून त्या दोघीही अत्यंत प्रभावित झाल्या. कास पठारावरील निसर्गाच्या सान्निध्यामुळे आपणास अत्युच्च कोटीचे आणि आश्चर्यकारक असे भावनिक समाधान मिळाल्याचेत्यांनी आवर्जून सांगितले. या परिसरास केवळ अभ्यासासाठीच नव्हे तर मानसिक समाधानासाठी सुद्धा वारंवार भेट देण्याचा मोह होतो असेही त्यांनी सांगितले. या निसर्ग सहवासात डॉ. याकीर यांना फॉरेस्ट ऑफिसर श्री. माने साहेब आणि मार्गदर्शक श्री. श्रीरंग शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी कास पठार समितीने डॉ. याकीर यांना कास पठाराचे चित्र देऊन उचित सन्मान केला. या सर्व उपक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. निखिल कुलकर्णी, डॉ. प्रसाद रायरीकर, डॉ. सुजित स्वामी तसेच इतर अनेक विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. डॉ. याकीर यांची ही सदिच्छा भेट म्हणजे होमियोपैथी आणि निसर्गशक्ती यामधील अतूट बंधाचा समृद्ध अनुभव होता असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.

No comments