बाप्पांच्या विसर्जनासाठी फलटण प्रशासन सज्ज
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २७ - गणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज झाले असून, घरगुती गणेश विसर्जनासाठी शहरात तीन ठिकाणी विसर्जनासाठी जलकुंभ तयार करण्यात आले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी निरा उसवा कॅनॉल येथे दोन क्रेन उपलब्ध करून देणेत आल्या आहेत. तसेच ज्या गणेश भक्तांना आपल्या गणेश मूर्ती दान द्यायच्या आहेत, त्यांच्यासाठी देखील वेगळी सोय करण्यात आली असल्याची माहिती फलटण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संजय गायकवाड यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण हायस्कुल व प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतीक भवन तसेच स्वामी विवेकानंद नगर या भागात तात्पुरत्या स्वरुपात घरगुती श्रीगणेश मुर्ती विसर्जना करिता जलकुंभ तयार करणेत आले आहेत. ज्या नागरिकांना श्रीगणेश मुर्ती दान करायच्या आहेत, त्यांचे संकलन करण्याकामी चार ठिकाणी वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. १) उंबरेश्वर चौक फलटण २) गजानन चौक, फलटण ३) डि.एड. कॉलेज चौक फलटण ४) पिरॅमिड चौक, फलटण.
मिरवणूक विर्सजन मार्गावर येणाऱ्या झाडाच्या फांदया तोडण्यात आल्या आहेत. विसर्जन ठिकाणी हॅलोजन व टॉवरची विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्ग तसेच गणेश विसर्जनाच्या ठिकाणी सि. सि. टिव्ही कॅमेरे बसविणेत आले असल्याची माहिती मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिली.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रीगणेश विसर्जना करीता निरा उजवा कालवा येथे दोन क्रेन उपलब्ध करून देणेत आल्या आहेत. तसेच याठिकाणी निर्माल्य गोळा करण्याकरता, निर्माल्य कलश उपलब्ध करुन देण्यात आला आहे. विसर्जनावेळी निरा उजवा कालवा या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सदर ठिकाणी रुग्णवाहिका, लाईफगार्ड, लाईफजॅकेट, स्ट्रेचर इत्यादी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती नगर परिषदेचे पाणी पुरवठा व आरोग्य अधिकारी विनोद जाधव यांनी दिली.
No comments