पत्नीने केला घात प्रकरणातील फरार आरोपी पकडण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ सप्टेंबर - प्रियसीसोबत लग्न करण्यासाठी प्रियकराने त्याच्या साथीदारासह, प्रियसीचा पती अजित बुरुंगले याचा गळा आवळून खून केला होता. व पुरावे नष्ट करण्यासाठी बुरुंगले याचे हातपाय बांधून त्याला कॅनॉलमध्ये फेकून दिला होता. त्यानंतर फलटण शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्हा उघड करत, याप्रकरणी पत्नी शिवानी व प्रियकर करण विठ्ठल भोसले याला अटक केली होती, मात्र त्यातील प्रियकराचा साथीदार राहूल उत्तम इंगोले रा. लोहगाव पुणे हा फरारी होता. या फरार आरोपीस फलटण ग्रामीण पोलीसांनी शिताफीने पकडले आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक १९/०९/२०२३ रोजी विडणी ता. फलटण गावचे हद्दीत निरा उजवा कॅनॉल मध्ये अनोळखी मयत मिळून आले होते. तपासामध्ये सदरचे मयत हे फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अजित बुरुंगले याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे अनोळखी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तपासामध्ये सदरचा गुन्हा फलटण शहर पोलीस ठाणे येथे घडल्याने वर्ग करण्यात आलेला होता. सदर गुन्हयांतील आरोपी करण विठ्ठल भोसले यास फलटण शहर पोलीसांनी पकडले होते. तेव्हापासून दुसरा आरोपी राहूल उत्तम इंगोले रा. लोहगाव पुणे हा फरारी होता. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची टीम सदर आरोपीच्या मागावर होती त्याप्रमाणे गोपनीय व तांत्रिक विश्लेषण करुन आरोपीस ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्हयांची कबुली दिली आहे. त्याप्रमाणे आरोपीस पुढील तपासकामी फलटण शहर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस नाईक चुतरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पोलीस कॉस्टेबल श्रीकांत खरात, हनुमंत दडस यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.
No comments