१२ गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या गुन्हेगारांना अटक ; चोरीचा माल विक्री करण्यासाठी जात असताना पोलिसांनी केली कारवाई
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३० : घरफोडी, विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरी सारख्या विविध बारा गुन्ह्यांमध्ये गेल्या दोन वर्षांपासुन पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरलेल्या दोन सराईतांना फलटण शहरात चोरीचा माल विक्री करण्यासाठी जात असताना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधितांकडून बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सागर शिवाजी काळे वय २८ रा. वडगाव ता फलटण व शक्तीमान ऊर्फ दयानंद अशोक भोसले वय २१ रा. साठे फाटा ता. फलटण अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, शहराती महात्मा फुले चौकातून दोघेजण विना नंबारच्या मोटरसायकलवरुन पोत्यातुन काहीतरी घेवून चालले होते. त्यांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला परंतू ते न थांबता भरधाव वेगाने निघुन गेले. पोलिसांनी संबंधितांचा पाठलाग करुन त्यांना थांबवुन त्यांची चौकशी केली असता. त्यांनी त्यांची नावे सागर शिवाजी काळे व शक्तीमान ऊर्फ दयानंद अशोक भोसले अशी सांगितली. त्यांना पोत्यामध्ये काय आहे याबाबत विचारले असता, त्यांनी त्यात तांब्याची व पितळी भांडी असुन ती विक्री करण्यासाठी निघालो असल्याचे सांगितले. याबाबत त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांनी सदर भांडी कोळकी ता. फलटण येथील एका बंद घरातुन चोरली असल्याचे सांगितले. दरम्यान दि. २४ अॉगस्ट रोजी बंद घराचे कुलुप तोडून घरातील तेवीस हजार ८०० रुपयांची भांडी चोरुन नेल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. संबंधित संशयीत आरोपींकडून पोलिसांनी दोन हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल व साठ हजार रुपये किंमतीची मोटर सायकल असा एकुण बासष्ट हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर आरोपींना न्यायालयात हजर केले आसता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधिक्षक बापू बांगर, पोलिस उपअधिक्षक राहुल धस, पोलिस निरीक्षक सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरज शिंदे व त्यांचे सहकारी आधिकारी व पोलिस कर्मचारी यांनी केली.
No comments