गणेशोत्सवात पारंपारिक वाद्याचा वापर प्राधान्याने करावा - प्रांत सचिन ढोले
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - गणेशोत्सव साजरा करत असताना सर्व गणेशोत्सव मंडळांनी, कायदा व सुव्यवस्थेचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. सर्व गणेशोत्सव मंडळांनी आपली नोंदणी करावी. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी घ्यावी. गणेश उत्सव साजरा करत असताना, कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन ज्या ज्या सूचना देतील, त्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे. सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी, पारंपारिक वाद्यांचा वापर प्राधान्याने करावा असे आवाहन करून आपल्या आवाजाचा, ध्वनी प्रक्षेपणाचा त्रास दुसऱ्यांना होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच हॉस्पिटल, रुग्ण, लहान मुले, वृद्ध यांना त्रास होणार नाही याचीही दक्षता घ्यावी अशा सूचना उपविभागीय अधिकारी तथा प्रांत सचिन ढोले यांनी दिल्या.
सार्वजनिक गणेशोत्सव २०२३ च्या नियोजनाबाबत दि.८ सप्टेंबर रोजी, दरबार हॉल, अधिकार गृह, फलटण येथे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक सुनील शेळके, सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, नगपरिषदेचे आरोग्य निरीक्षक विनोद जाधव यांच्यासह विविध अधिकारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.
गणेशोत्सव काळामध्ये प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने वीज घेताना तात्पुरत्या स्वरूपात वीज कनेक्शन महावितरणच्या माध्यमातून घ्यावे. अनधिकृत कनेक्शन घेवू नये आशा सूचना प्रांत सचिन ढोले दिल्या.
सार्वजनिक गणेशोत्सव २०२३ च्या आढावा बैठकीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पत्रकार तसेच नागरिक यांच्याकडून सूचना आलेले आहेत, त्या सूचनेच्या अनुषंगाने, त्याचप्रमाणे राज्य शासन व सर्वोच्च न्यायालयाच्या विविध मार्गदर्शक तत्वाच्या अनुषंगाने, शांततेत, जल्लोषात, उत्साहात परंतु कायद्याच्या चौकटीत राहून, गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांनी दिल्या.
फलटणचा गणेशोत्सव हा डीजे मुक्त व्हावा हा मुद्दा बैठकीत चर्चिला गेला, त्यावर बोलताना पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस म्हणाले की, सर्व गणेशोत्सव मंडळांनी डीजे चा वापर टाळावा व पारंपारिक वाद्याचा वापर करावा, तसेच सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वाच्या अनुषंगाने, आवाजाचे जे डेसिबल लिमिट आहे, त्या लिमिटमध्येच आपली वाद्य वाजवून गणेश उत्सव साजरा करावयाचा आहे.
आढावा बैठकीमध्ये फलटण नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक विनोद जाधव यांनी गणेश उत्सव व विसर्जन या संदर्भात फलटण नगरपालिकेत कडून करण्यात आलेले नियोजन सांगितले. यामध्ये विसर्जनासाठी निरा उजवा कॅनॉल व फलटण शहरातील बारवबाग, यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे विसर्जनाचे नियोजन करण्यात आले असून, ज्या गणेश भक्तांना आपल्या गणेश मूर्ती दान करावयाच्या आहेत अशांसाठी, शहरात ४ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असल्याचे विनोद जाधव यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विद्युत कनेक्शन वीज कनेक्शन साठी रीतसर अर्ज करावेत त्यांना त्वरित वीज कनेक्शन देण्यात येईल व आकडे टाकून वीज वापरू नये असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले.
तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी, गणेशोत्सव काळात व विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करून, उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आवाजाची मर्यादा पाळली जाईल असे सांगितले. तसेच विसर्जन मिरवणुकीतील रस्त्याला पडलेले खड्डे दुरुस्त करण्यात यावे असे सांगितले.
आढावा बैठकीमध्ये गणेश उत्सव काळात घ्यावयाची दक्षता, विसर्जन मिरवणुक, महावितरणच्या अंतर्गत असणारे प्रश्न, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रश्न, निरा उजवा कालवा, एक्साईज ऑफिस या संबंधित असणारे प्रश्नावर चर्चा करून, त्या त्या विभागांना प्रांत सचिन ढोले यांनी सूचना दिल्या.
No comments