जालना लाठीचार्जचे फलटण येथे पडसाद ; मराठा क्रांती मोर्चा फलटणची संयमी भूमिका ; शासनाचा निषेध
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २ सप्टेंबर - जालना येथे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असतानाच, आज फलटणमध्ये देखील मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने निषेध व्यक्त करून मोर्चा काढण्यात आला व येत्या चार ते पाच दिवसात मोठे आंदोलन उभे करू असा इशारा देण्यात आला.
जालना येथे आंदोलकांवर लाठी चार्ज झाल्याची बातमी समजल्यानंतर, फलटण येथे आज सकाळी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, समाज बांधव जमू लागले. काही क्षणात वातावरण तणावपूर्ण झाले, परंतु मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी संयमाची भूमिका घेत, कोणतेही अनुचित पाऊल न उचलता, डेक्कन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत पदयात्रा काढून, तिथे लाठीचार्ज करणाऱ्या शासनाचा निषेध व्यक्त केला. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना हार अर्पण केले.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बोलताना सुभाषराव शिंदे म्हणाले, जालना येथे काल राज्याच्या दृष्टीने भयानक घटना घडलेली आहे. महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचा हा महाराष्ट्र आहे, साधुसंताचा महाराष्ट्र आहे, परंतु महाराष्ट्राच्या सध्याच्या सरकारने, महाराष्ट्राच्या परंपरेला तडा देऊन आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला. जालना येथील केलेली घटना ही ठरवून केलेली गोष्ट आहे. या गोष्टीचा मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने निषेध. मराठा समाज गेली अनेक वर्ष शांततेच्या मार्गाने आरक्षण मिळवण्यासाठी लढा देत आहे, आम्ही कधीही हिंसेचा मार्ग अवलंबला नाही, जालना येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू होते, परंतु हे आंदोलन मोडून काढण्याकरता, शासनाने, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम ठेवला व शिंदे, फडणवीस व पवार यांच्या सरकारने आंदोलकांवर अत्याचार केला व काठीने मारहाण केली. शासनाची ही पद्धत बरोबर नाही, जनता या शासनाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, आणि येत्या चार ते पाच दिवसात यापेक्षा मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिला.
No comments