क्यूआर कोड स्कॅनिंग माध्यमातून गणेशोत्सव स्टेज - मंडपाची परवानगी घ्यावी - संजय गायकवाड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेश उत्सव काळात लागणाऱ्या विविध परवानग्या आता क्यूआर कोड स्कॅनिंगच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने, अर्ज सादर करण्याची व्यवस्था फलटण नगर परिषदेच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती देऊन, क्यूआर कोड चा वापर करुन आपल्या गणेशोत्सव मंडळाचा स्टेज, मंडप परवाना घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.
फलटण शहरामध्ये सन २०२३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यापूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवास नगरपरिषदेची स्टेज/मंडप परवानगी घेणे कामी नगरपरिषदेकडे समक्ष अर्ज सादर करावे लागत होते. त्यानुसार ऑफलाईन पध्दतीने परवानगी देणेत येत होती. सन २०२३ मध्ये फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकरी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी नाविन्यपुर्ण उपक्रम म्हणून, शहरातील गणेश मंडळे यांना नगरपरिषद कार्यालयात समक्ष अर्ज सादर न करता, लगेचच डिजीटल स्कॅनर (बारकोड) द्वारे स्टेज/मंडप परवाना ऑनलाईन पध्दतीने देणेचा उपक्रम हाती घेतला आहे.
सदरचा स्टेज / मंडप परवाना सार्वजनिक मंडळांना शासनाच्या धोरणानुसार विनाशुल्क प्राप्त होणार आहे. स्टेज / मंडप परवाना ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देताना ऑनलाईन माहिती भरणेसाठी आवश्यक तो अर्ज क्यूआर कोड मध्ये उपलब्ध करुन दिलेला आहे. त्यामध्ये ऑनलाईन नोंदणी करणे कामी गुगल फॉर्म लिंक व क्यूआर कोड चा वापर करावा. फलटण नगरपरिषदेच्या या उपक्रमामुळे गणेशोत्सव मंडळांना नगरपरिषदे मार्फत देणेत येणारा स्टेज मंडप परवाना काही तासातच प्राप्त होणार आहे. प्राप्त झालेला परवाना श्रीगणेश मंडळाने सादर केलेल्या ई मेल व्दारे प्राप्त होणार आहे. तसेच सदरचा परवाना फलटण शहर पोलीस स्टेशन यांचे कडे ई मेलव्दारे पाठविणेत येणार आहे. वरिल कामी काही तांत्रीक अडचण निर्माण झालेस ऑफलाईन पध्दतीने समक्ष नगरपरिषद कार्यालयात परवाना देणेसाठी विशेष कक्षाची स्थापना करणेत आलेली आहे. सदरचा कक्ष हा सुट्टी दिवशी सुध्दा सुरु ठेवणेत येणार आहे. तरी फलटण शहरातील सर्व गणेश मंडळांनी खालील दिलेल्या क्यूआर कोड चा वापर करुन आपल्या श्रीगणेश मंडळाचा स्टेज मंडप परवाना करुन घ्यावा.
तसेच सर्व श्रीगणेश मंडळांनी स्टेज मंडप उभारताना वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी व पर्यावरण पुरक श्रीगणेशोत्सव साजरा करावा. असे अवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक फलटण नगरपरिषद फलटण यांनी केले आहे.
क्यूआर कोड स्कॅनिंग पद्धत -
१. फलटण नगरपरिषदेने उपलब्ध करुन देणेत आलेला क्यूआर कोड स्कॅनरच्या सहाय्याने स्कॅन करावा. २. स्कॅन केल्यानंतर स्टेज / मंडप परवाना मिळणेकामी अर्ज उपलब्ध होईल. ३. उपलब्ध अर्जाची प्रिंट काढून माहिती भरुन घ्यावी. ४. सदर अर्जामध्ये उपलब्ध असलेल्या गुगल फॉर्म लिंक तसेच त्यांचा क्यूआर कोड च्या सहाय्याने ऑनलाईन पध्दतीने माहिती भरुन अर्जात नमुद असलेले कागदपत्रे ( माहिती भरलेला मागणी अर्ज, अर्जदार यांच्या आधारकार्डची छायांकित प्रत तसेच ज्या ठिकाणी मंडप उभारणेत येणार आहे त्या ठिकाणचा कच्चा नकाशा व ज्या ठिकाणी मंडप स्टेज उभारण्यात येणार आहे त्या ठिकाणाचा फोटो अपलोड करावेत. ५. गुगल फॉर्ममध्ये दर्शविलेली माहिती भरणे अनिवार्य आहे. ६. अर्ज प्राप्त होताच ४८ तासाच्या आत अर्जाची छाननी करुन सदरची स्टेज / मंडप परवानगी आपण नोंदणी केलेल्या ई-मेलवर उपलब्ध करुन देणेत येईल.
No comments