३० वर्षे तालुका विकासा पासुन मागे राहिला, तो बॅकलॉग भरून काढण्याचं काम ३ वर्षात केले - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ; नाईकबोमवाडी एमआयडीसीच्या माध्यमातून युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध होणार
फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा ) - फलटण तालुक्यातील जनतेने मला खासदार केले, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी फलटण तालुक्यामध्ये विविध विकास कामे मार्गी लावलेली आहेत. गेल्या ३० वर्षांमध्ये फलटणच्या राज्यकर्त्यांनी कोणतीही विकासकामे न केल्यामुळे, फलटण तालुका विकासा पासुन मागे राहिलेला होता, तो बॅकलॉग भरून काढण्याचं काम या तीन वर्षांमध्ये मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केला आहे. नीरा देवघरचे पाणी परत आपल्या भागाकडे वळवले, धोम बलकवडी रखडलेले कॅनॉलच्या कामांना गती देऊन हे कॅनॉल बारमाही करणे , तालुक्यातील विविध कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. वडले गावाच्या हाकेच्या अंतरावर नाईकबोमवाडी एमआयडीसी मंजूर करून आणली आहे, भविष्यामध्ये फलटण तालुक्यातील तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणे व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी इथून पुढे प्रयत्न करणार आहे. लवकरच एमआयडीसीचा भूमिपूजन होऊन या पंचक्रोशीतीलच न्हवे तर तालुक्यातील हजारो मुलांना यातून रोजगार उपलब्ध होणार आहे. विविध प्रकारचे व्यवसाय या ठिकाणी उपलब्ध होतील, तसेच शेतकरी ,शेतमजूर ,कामगार, महिला ,यांना ही यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. भविष्यात बारामती सारखा विकास फलटणचा करण्याचे माझे स्वप्न आहे, यासाठी जनतेची साथ अत्यंत महत्त्वाची असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
वडले येथे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मंजुर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी प्रदेश कार्यकारणी सदस्य व लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे , युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, तालुका अध्यक्ष बजरंग गावडे ,फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील, वडले गावचे माजी सरपंच पोपटराव सोनवलकर, किरण लाळगे, दादा खवळे उपस्थित होते.
वडले गावामध्ये केंद्रीय जलजीवन मिशन योजनेतून १ कोटी ३१ लाख रुपये, वडले ते विडणी रस्ता ३ कोटी ५१ लाख रुपये, जिल्हा परिषद शाळा भूमिपूजन ९.५० लाख रुपये ,स्मशान भूमी दुरुस्ती ३.५० लाख रुपये, खासदार फंडातून स्ट्रीट लाईट साठी १.२० हजार रुपये अशा विविध विकासकामांचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माजी सरपंच पोपटराव सोनवलकर व विविध कार्यकारी सोसायटीचे व्हा. चेअरमन व वांजळे परिसरातील विविध पदाधिकाऱ्यांनी काल भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
पोपटराव सोनवलकर यानी प्रस्ताविकामध्ये खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या कामाबद्दल कौतुक व आभार व्यक्त केले व उर्वरित कामे लवकरात लवकर मार्गी लावावी अशी मागणी केली .
यावेळी बोलताना प्रदेश कार्यकारणी सदस्य व लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे म्हणाले की भविष्यात फलटण तालुक्यातील जनतेने खासदार रणजीतदादांच्या पाठीशी आपले आशीर्वाद उभे करावेत, कारण गेल्या तीन वर्षांमध्ये ज्या पद्धतीने फलटणचा विकास झालेला आहे, ते पाहता या तालुक्यातील तरुणांचे भविष्य घडवण्यासाठी दादा काम करीत आहेत . तालुक्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष बजरंग गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सोनवडीचे सरपंच बाळासाहेब शिंदे भाडळी चे माजी सरपंच सचिन पिसाळ, पिंपरदचे युवा नेते तुकाराम ढमाळ, तिरकवाडीचे अतुल पवार ,बापूराव सोनवलकर, ज्ञानेश्वर लाळगे योगेश लाळगे, अविनाश लाळगे उपस्थित होते.
No comments