शरद पवार यांच्यामुळेच विकास प्रक्रिया गतिमान करू शकलो - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांचे आदर्शांचा वारसा घेऊन सक्रिय राजकारणात येताना खा. शरद पवार यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्यानेच आपण सलग ३० वर्षे सातारा जिल्ह्यात विकास प्रक्रिया गतिमान करु शकलो, त्यांच्यामुळेच धोम - बलकवडी प्रकल्प पूर्णत्वास नेता आला, त्यांनीच सत्तेची संधी दिल्याचे नमूद करीत, आपली सर्वांची साथ ही तितकीच महत्वाची ठरल्याचे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
कोळकी ग्रामपंचायत माध्यमातून सुमारे साडेतीन - चार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची उद्घाटने, भूमिपूजने करण्यात आली त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित जाहीर सभेत आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. दिपकराव चव्हाण होते, तर राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रा. भिमदेव बुरुंगले, माजी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, पुंडलिक नाळे, सरपंच स्वप्नाताई कोरडे, उप सरपंच विकास नाळे, ग्रामविकास अधिकारी आर. सी. साळुंखे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, कोळकी व पंच क्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
फलटण शहर व तालुक्याला प्रेरणादायी सामाजिक, सांस्कृतिक वारसा लाभला आहे, येथे एकमेकांचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या माध्यमातून अतूट नाते निर्माण झाले असून त्या आधारे गेल्या ३० वर्षात आपण इथला सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक वारसा जपला त्यातून सर्वांगीण विकासाची चौकट निर्माण केली कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून कायम दुष्काळी पट्टा हरित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला, परंतू अलीकडे हे सर्व बिघडविणारी दहशतीची प्रवृत्ती येथे वाढत असल्याने त्यापासून तालुका वाचविण्यासाठी खा. शरद पवार यांना सोडून आपल्याला वेगळा राजकीय निर्णय घ्यावा लागला असल्याचे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
आ. श्रीमंत रामराजे म्हणाले, हा निर्णय घेण्यामागे आपला राजकीय हेतू किंवा स्वार्थ नाही, काही मिळविण्याचा उद्देश तर अजिबात नाही कारण गेल्या ३० वर्षात साहेबांनी आपल्याला भरभरुन दिले आहे, मात्र तुम्हा सगळ्यांचे प्रेम, आणि पाठिंबा जपण्याबरोबर ३० वर्षात निर्माण केलेली विकासाची चौकट मोडणाऱ्या प्रवृत्ती थोपविण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला.
आ. श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्याला स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. बाळासाहेब देसाई, स्व. मालोजीराव नाईक निंबाळकर यांच्या सारख्या थोर विभूतींच्या सुसंस्कृत विचारांचा, त्यांनी घालुन दिलेल्या आदर्शाचा वारसा लाभला असल्याने पुढील काळात जिल्ह्याचे नेतृत्व कोणाच्या हातात देणार असा मोठा प्रश्न निर्माण झाला असताना अत्यंत सावध पावले टाकून हा निर्णय करताना राज्यातील ३ पक्षांच्या सरकार मध्ये काम करताना आपण कोणाशी तडजोड करणार असा यक्ष प्रश्न कार्यकर्ते व सर्वसामान्यांसमोर असणे गैर नाही तथापि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर नसल्याने आपण त्याबाबत नेहमी प्रमाणे स्वतंत्र निर्णय घेऊ शकतो.
अध्यक्षीय भाषणात आ. दिपक चव्हाण म्हणाले, धोम - बलकवडी प्रकल्पाचा निर्णय आ. श्रीमंत रामराजे यांनी नियोजन पूर्वक केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडले, हरित क्रांती, शैक्षणिक क्रांती, औद्योगिक क्रांती, कृषी क्रांती द्वारे तालुक्याचा चौफेर विकास झाला, यासाठी अहोरात्र मेहनत घेताना त्यांना सर्वसामान्य लोकांची उत्स्फूर्त साथ लाभल्याने सर्वांगीण उन्नती करता आली आगामी काळात ही साथ अखंडित राखा तरच विकासाची ही चौकट अभेद्य राहील. तरुणांची संख्या मोठी असून त्यांना उत्तम शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देताना कमिन्सच्या माध्यमातून काहींना नोकरीच्या संधी तर काहीना उद्योग व्यवसायाच्या संधी देण्यात आल्या भविष्यात ही प्रक्रिया अधिक गतिमान करता येईल.
श्रीमंत संजीवराजे म्हणाले, फलटण शहरालगत कोळकी, जाधववाडी, फरांदवाडी येथे वाढती लोकवस्ती विचारात घेता वेगळा विचार करुन येथे विकास प्रक्रिया गतिमान करताना भरीव निधीच्या तरतुदीसाठी नगर पंचायत सारखी संकल्पना येथे राबविण्याची गरज आहे. फलटण शहर विस्ताराला आता जागा उरली नसताना येथे बाहेरुन उद्योग, व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने येणाऱ्यांची संख्या सतत वाढत असल्याने विकास प्रक्रिया कितीही गतीमान केली तरी ती अपुरी वाटते त्यासाठी अन्य मार्गाने विकास करण्याचा निर्णय घ्यावा लागेल.
श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले, राजकारण सतत बदलत असल्याने विचार पूर्वक निर्णय घ्यावे लागतात, शासन स्तरावर घेतलेले विकासाचे निर्णय रद्द झाले, बदल होताच तेच निर्णय पुन्हा झाले आणि रोखलेला कोट्यवधींचा निधी पुन्हा उपलब्ध झाला, श्रीमंत रामराजे यांनी योग्य निर्णय घेतल्याने आज विकास प्रक्रिया अखंडित सुरु ठेवता आली, भविष्यात ती अधिक गतिमान करता येईल.
प्रारंभी सरपंच सौ. स्वप्नाताई कोरडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात राबविलेल्या विविध विकास योजनांचा आढावा घेत केलेल्या नागरी सुविधांची माहिती दिली. सहकारी ग्रामपंचायत सदस्य व नेत्यांनी दिलेल्या संधीचे सोने करता आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच व विद्यमान सदस्या सौ. रेश्मा देशमुख यांनी कोळकीच्या विकासासाठी नेत्यांनी उत्तम साथ व मार्गदर्शन केल्याने विकास गतिमान राहिला तथापि येथे उत्तम क्रीडांगण उभारण्याची गरज आहे त्यासाठी ठोस कार्यवाहीची मागणी त्यांनी केली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, संत सेना महाराज सभागृह आणि लोकशाहीर आण्णा भाऊ साठे सभागृह उभारणी बद्दल चंद्रकांत पवार यांनी धन्यवाद दिले, बाबा लोंढे यांचे समयोचीत भाषण झाले. अक्षय गायकवाड यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.
No comments