सातारा शहरात मराठा समाज बांधवांनी काढली बाईक रॅली
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) : मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या सुकाणू समितीने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. सातारा शहरांमध्ये साखळी उपोषणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. गुरुवारी साताऱ्यात मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी जनजागृती व्हावी, याकरिता सुमारे 500 मराठा बांधवांनी सातारा शहरातून बाईक रॅली काढली. मराठा आरक्षण देणार नसाल तर निवडणुकांमध्ये याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे वरिष्ठ पदाधिकारी शरद काटकर यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यभर साखळी उपोषणे नेत्यांना गावबंदी तसेच प्रबोधन प्रचार इत्यादी कार्यक्रम सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातही आरक्षणाचा विषय ऐरणीवर असून साताऱ्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे.
मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर साखळी उपोषणाचे सत्र सुरू झाले आहे. गुरुवारी सकाळी पहिल्या सत्रात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सुमारे ५०० आंदोलकांनी सातारा शहरातून बाईक रॅली काढली. यामध्ये महिला सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. एकंदर आंदोलनाचे संवेदनशील स्वरूप लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ही बाईक रॅली शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू झाली. मराठा क्रांती मोर्चा चे पदाधिकारी बाईक रॅलीने पोवई नाका शाहू चौक राजवाडा गोल बागेला वळसा घालून कर्मवीर पथावरून पोलीस मुख्यालय मार्गे पुन्हा पवई नाका व तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर आले. "आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं एक मराठा लाख मराठा”, अशी जोरदार घोषणाबाजी या रॅलीमध्ये करण्यात आली. या रॅलीने संपूर्ण सातारा शहरातील लक्ष वेधून घेतले. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पदाधिकारी संदीप पोळ, संग्राम बर्गे, शरद काटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आंदोलनात या मोर्चात सहभागी झाले होते. मराठा आरक्षण हा विषय अत्यंत संवेदनशील असून याचा राजकारणासाठी वापर होऊ नये, पण सध्याच्या सरकारकडून निवडणुकीतील एक संवेदनशील मुद्दा इतक्याच कारणास्तव त्याचा वापर केल जात आहे. आरक्षणाचे घोंगडे फार काळ भिजत ठेवू नका येत्या चार दिवसात आरक्षणाच्या संदर्भात आम्हाला योग्य ती कार्यवाही दिसावी, अन्यथा आरक्षण न दिल्यास याची निवडणुकीत जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा काटकर यांनी दिला आहे.
No comments