सेंद्रिय शेतीत व्यवसाय व नोकरीच्या संधी - डॉ. शिवराज कणसे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ - देशातील हरितक्रांती नंतर अनेक शेतकरी रासायनिक खते व कीटक नाशकांचा वापर प्रचंड प्रमाणात करू लागले. सद्य परिस्थितीमध्ये रासायनिक खतांच्या वापराची स्पर्धा चालू असल्याचे चित्र आहे. त्याचा दूषपरिणाम मानवी आरोग्यावर होतो आहे. त्याचबरोबर मातीचा पोत ही खालावत आहे. या दोन्ही गोष्टींना पर्याय म्हणून शेंद्रीय शेती काळाची गरज बनलेली आहे. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हैद्राबाद येथील एक्झोम लाईफ सायंन्स प्रा. लि. कंपनीचे पुणे क्षेत्राचे अधिकारी डॉ. शिवराज कणसे यांनी केले.
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे रसायनशास्त्र विभागांतर्गत ऑरगनिक फॅन्सियर क्लब व अग्रणी महाविद्यालय पुरस्कृत घेण्यात आलेल्या “सेंद्रिय शेतीतील व्यवसाय व नोकरीच्या संधी” या कार्यशाळेत ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. पी.एच. कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतेवेळी ऑरगनिक फॅन्सियर क्लबची स्थापना व त्यामागील उद्देश सांगताना सेंद्रिय पदार्थासंबंधी समाजात जनजागृती करण्याच्या हेतूने महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक हे प्रामुख्याने योग्य भूमिका बजावू शकतात असे प्रतिपादन करून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन ऑरगनिक फॅन्सियर क्लबचे उद्घाटन केले. या कार्यक्रमासाठी प्रा. सौ. रुक्मिणी भोसले ,अग्रणी महाविद्यालय समन्वयक, प्रा. डॉ. अशोक आचार्य – विभाग प्रमुख रसायनशास्त्र विभाग व्यासपिठावर उपस्थित होते.
प्रा. प्रमोद गायकवाड – समन्वयक ऑरगनिक फॅन्सियर क्लब यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी बी. एस्सी. भाग – ३ चे सर्व विद्यार्थी ,विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मोनाली पाटील व विद्यार्थिनी कु. कोमल गुंजवटे यांनी केले. आभार प्रा. सौ. ज्योती काळेल यांनी मानले.
डॉ. कणसे म्हणाले जमिनीची सुपीकता मातीमधील असलेल्या मुलद्रव्यावर अवलंबून असते. मृदेची रसायनिक रचना समजून घेणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने सेंद्रिय कर्ब (०.७५ ते १ % ) NPK व इतर मुलद्रव्य योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे त्याचबरोबर मातीचा सामू (pH ६.७ ते ७.५) व तापमान १२ ते १५ अंश सेल्शियस असल्यास पिक रोगाला कमी बळी पडते व चांगली वाढ होऊन उत्कृष्ट उत्पादन मिळते. रसायनशास्त्र विषयाची पदवी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती व्यवसाय व नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत याचबरोबर विद्यार्थ्यांनी संशोधन दृष्टीकोन ठेवल्यास सेंद्रिय खत व औषधे निर्मिती करून विद्यार्थी भविष्यात चांगला व्यावसायिक होऊ शकतो असे ते म्हणाले.
No comments