सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी अधीस्वीकृतीपत्रिकेसाठी प्रस्ताव द्यावेत - पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांचे आवाहन
सातारा : सातारा जिल्ह्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व साप्ताहिक माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकार, छायाचित्रकार, स्ट्रिंजर्स यांनी शासकीय अधीस्वीकृती पत्रिकेसाठी सातारा जिल्हा माहिती कार्यालयाकडे विहित नमुन्यात प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांनी केले.
पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांनी आज समितीचे सदस्य गोरख तावरे व चंद्रसेन जाधव यांच्या समवेत सातारा जिल्हा माहिती कार्यालयाला भेट दिली. जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, माहिती अधिकारी हेमंत चव्हाण, राहुल पवार यांनी समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे व सदस्यांचे स्वागत केले. जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे व अधिकाऱ्यांनी समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांना व सदस्यांना जिल्ह्यातील अधिस्वीकृती पत्रिकाधारकांची माहिती व या विषयाची सद्यस्थिती याबाबत दिली.
सातारा जिल्ह्यातील जेष्ठ व वयोवृध्द पत्रकारांना अधिस्वीकृती कशी देता येईल याविषयी चर्चा करून हरिष पाटणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ज्येष्ठ पत्रकारांकडे सहानुभूतीच्या दृष्टीने पाहून त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन पुढील बैठकीपूर्वी ज्येष्ठ पत्रकारांचे परिपूर्ण प्रस्ताव विभागीय अधिस्वीकृती समिती समोर येतील, असे पहावे अशा सूचना पाटणे व सदस्यांनी यावेळी दिल्या. ज्येष्ठ पत्रकारांचे बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील प्रलंबित प्रस्तावांची माहिती घेऊन सदरचे प्रस्ताव पूर्ण करून घेण्याबाबत सूचना दिल्या. अधिस्वीकृतीपत्रिकेसाठीचे प्रस्ताव, प्रचलित नियम, मिळणाऱ्या सवलती याविषयी सातारा जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. विविध नमुण्यात प्रस्ताव कसे दाखल करावेत, प्रस्तावांना कोण कोणती कागदपत्रे असावीत, त्रुटी कशा पूर्ण कराव्यात याविषयी सर्व पत्रकारांना जिल्हा माहिती कार्यालयात मार्गदर्शन मिळावे अशा सूचना यावेळी बैठकीत देण्यात आल्या . सातारा जिल्ह्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जास्तीत जास्त पत्रकारांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडे विहित नमुन्यात अधिस्वीकृती पत्रिकेसाठी प्रस्ताव दाखल करावेत असे आवाहन पाटणे यांनी यावेळी केले. बैठकीत गोरख तावरे व चंद्रसेन जाधव यांनी मौलिक सूचना केल्या. हेमंत चव्हाण यांनी आभार मानले .
No comments