Breaking News

मराठा आरक्षण : फलटण मध्ये दि. २५ पासून साखळी उपोषण

Maratha Reservation: Chain fasting starts in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृतिसेवा) दि.२३  - मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुक्याच्या  वतीने बुधवार दि २५ ऑक्टोंबर पासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, फलटण तहसील कार्यालया बाहेर साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय सकल मराठा समाज फलटण तालुका यांच्यावतीने घेण्यात आला आहे.

    मराठा क्रांती मोर्चा फलटण त्यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह फलटण येथे मराठा समन्वयकांची बैठक संपन्न झाली. या मध्ये मराठा समाजाला ५०% च्या आत ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या महिनाभरा पासून आंदोलन सुरू केले असून, सरकारला दिलेला ४० दिवसाचा वेळ २४ ऑक्टोंबरला संपत असून, त्यांनी आरक्षण न दिल्यास ,शांततेच्या मार्गाने राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी, साखळी उपोषण,  कॅन्डल मार्च काढणे अशी आंदोलनाची दिशा त्यांनी ठरवून दिली आहे, त्याला पाठिंबा म्हणून फलटण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने, फलटण तालुक्यात गाव पातळीवर साखळी उपोषण न करता,  तहसील कार्यालयाबाहेर  एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात साखळी उपोषण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 

     दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता साखळी उपोषणास सुरुवात होणार असून, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आता नाही तर कधीच नाही या भावनेतून फलटण तालुक्यातील सर्व मराठा समाजाने ही शेवटची लढाई समजून, या साखळी उपोषणास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

     आतापर्यंत मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुक्याने तालुकास्तरावरील पहिला मोर्चा असो,तेरा दिवसाचे साखळी उपोषण असो की कालची मनोज जरांगे पाटलांची सभा असो फलटण तालुका सकल मराठा समाजाने कोणताही अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच चेहरा नसताना केवळ समाज म्हणून एकी दाखवून सर्व आंदोलन यशस्वी केली आहेत, आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली असून, सर्वांनी यात मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments