राजकीय नेत्यांना बिबी गावात प्रवेशबंदी ; 'चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष
फलटण - सातारा रोडवर, बिबी फाटा येथे लावण्यात आलेला प्रवेश बंदीचा फलक |
Political leaders banned from Bibi village
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ : मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत आमदार, खासदार व कुठल्याही राजकीय पक्ष व नेत्यास गावात प्रवेश नाही. आपण आपली मान मर्यादा राखूनच गावात प्रवेश करावा. 'चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष ; सर्व राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी' असा फलक सकल मराठा समाज बिबी ता. फलटण गावाच्या वतीने फलटण - सातारा रोडवर लावण्यात आला आहे.
आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाज अधिक आक्रमक झाला असुन, जोपर्यंत मराठा समाजास ओबिसीमधून आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय कार्यक्रमांना जायचे नाही व अगामी काळात होऊ घातलेल्या निवडणूकांवर बहिष्कार टाकण्याचा आक्रमक पवित्राही मराठा समाजाने घेतला आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजास कुणबी प्रमाण पत्र मिळावे अशी मागणी करुन आंदोलन सुरु केले होते. या कालावधीत मराठा समाज हा कुणबी असल्याचे हजारो पुरावे देण्यात आले होते. शासनाने तीस दिवसांचा कालावधी मागितल्यानंतर जरांगे यांनी चाळीस दिवसांचा कालावधी शासनास दिला होता व आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. दि. २४ ऑक्टोबर रोजी चाळीस दिवस उलटल्यावरही शासनाने मराठा आरक्षणाबाबत निर्णय जाहिर केला नाही. त्यामुळे मराठा समाज आरक्षण मुद्द्यावरुन चांगलाच आक्रमक झाला आहे. फलटण तालुक्यातही याबाबतचे संतप्त पडसाद उमटले असून तालुक्यातील आसू,निरगुडी, चव्हाणवाडी, बिबी आदी गावांमध्ये लोकप्रतिनिधींना गावबंदी केल्याचे मोठे फलक झळकले आहेत. जर गावात आलात तर अपमान सहन करण्याची तयारी ठेवा असा इशाराही देण्यात आला आहे. गावोगावी याबाबत बैठकींचे सत्र सुरु असुन राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करणाऱ्या गावांमध्ये दिवसेंदिवस वाढ होणार असल्याचे चित्र फलटण तालुक्यात दिसत आहे.
No comments