महसूल मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांची खा. रणजितसिंह यांच्या निवासस्थानी भेट ; मोहिते - पाटील यांचे विरोधक फलटण मध्ये एकत्र
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २ - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन, फलटण तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा घेत सविस्तर चर्चा करीत, माढा मतदारसंघातील विकासकामे करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, आमदार राहुल कुल, आमदार जयकुमार गोरे , राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, भाजपचे नेते बाळासाहेब गावडे उपस्थित होते. दरम्यान मोहिते- पाटील यांचे विरोधक फलटण मध्ये एकत्र आल्याने, माढा मतदारसंघात मोठी चर्चा सुरू झाली असून, फलटणचे नेते माळशिरस मध्ये एकत्र येत होते, मात्र आता माढा - माळशिरसचे नेते फलटण मध्ये एकत्र आले असल्याने मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील हे म्हसवड येथील नियोजित कार्यक्रमास जात असताना त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी भेट दिली, दरम्यान यावेळी फलटण तालुक्यातील नूतन महसुली कार्यालय,आरटीओ कार्यालय,नवीन विश्राम गृह ,तसेच विविध विकासकामे यांची माहिती घेतली खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मागणी केलेल्या विविध विकासकामांसाठी सहकार्य करण्याचे आदेश विविध अधिकाऱ्यांना दिले आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघातील माण, खटाव व फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विकासकामे सुचविली असून, त्या कामांची माहिती ना.विखे पाटील यांनी घेतली व ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले आहे.
ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबर माढा मतदारसंघातील विविध कामांचा आढावा घेतला यावेळी आमदार बाबनदादा शिंदे,आमदार जयकुमार गोरे,आमदार राहुलदादा कुल,उत्तमराव जानकर, लोकसभा संयोजक ,जयकुमार शिंदे, अँड नरसिंह निकम, युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर अशोकराव जाधव, व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments