महाराष्ट्र हॉकी संघात फलटणच्या श्रेया चव्हाण, शिफा मुलाणी, निकिता वेताळ यांची निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र यांच्या मान्यतेने हॉकी सातारा संघटनेच्या तीन खेळाडू शिफा मुलाणी,श्रेया चव्हाण व निकिता वेताळ यांची छत्तीसगड येथे होणाऱ्या पहिल्या वेस्ट झोन महिला हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झाली आहे. या तिन्ही खेळाडू मुधोजी हायस्कूल फलटणच्या असून त्यांच्या महाराष्ट्र संघातील निवडीमुळे, सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
सातारा जिल्ह्याच्या तीन हॉकी खेळाडूंना महाराष्ट्र हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी पहिल्यांदाच मिळाली आहे. त्या छत्तीसगड येथील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधीत्व करतील. पुणे येथील पिंपरी चिंचवड पॉलीग्रास मैदानावरती हॉकी महाराष्ट्र संघटनेने निवड चाचणी आयोजित केली होती, त्यामध्ये वरील तिघी बरोबरच अनुष्का चव्हाण हिने निवड चाचणी मध्ये भाग घेतला होता.त्यामध्ये शिफा मुलाणी, श्रेया चव्हाण व निकिता वेताळ यांनी उत्कृष्ट खेळ करत महाराष्ट्राच्या संघामध्ये स्थान मिळविले. त्यांना दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव श्री महेश खुटाळे सर व हॉकी प्रशिक्षक श्री सचिन धुमाळ सर प्रशिक्षण देत आहेत. तसेच प्रशिक्षणामध्ये सहाय्यक म्हणून श्री बी.बी. खुरंगे सर, व कु. धनश्री शिरसागर मॅडम सहाय्य करत आहेत.
सर्व प्रशिक्षक व खेळाडूंचे विधान परिषदेचे मा.सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब, फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार माननीय श्री दीपकराव चव्हाण साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन माननीय श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर साहेब महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर साहेब, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन श्री शिवाजीराव घोरपडे साहेब, क्रीडा समितीचे सर्व सदस्य व दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष श्री बाहुबली शहा, उपाध्यक्ष श्री सचिन लाळगे खजिनदार श्री पंकज पवार सदस्य श्री प्रवीण गाडे, श्री महेंद्र जाधव माजी राष्ट्रीय खेळाडू श्री सुजीत निंबाळकर यांनी अभिनंदन केले.
No comments