Breaking News

श्री दत्त इंडियाने दुसरा हप्ता द्यावा : स्वाभिमानाची मोर्चाद्वारे मागणी

 

Shri Dutt India should pay second installment: demand for self-respect through march

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १६ ऑक्टोबर -  स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून  सोमवार दि.१६.१०.२३ रोजी साखरवाडी येथे श्री दत्त इंडिया शुगर प्रायव्हेट लिमिटेड साखरवाडी कारखान्याकडून सन २०२२-२३ च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह कारखानास्थळावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. या मोर्चात साखरवाडी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

    साखरवाडी ग्रामपंचायत येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर हस्ते पुष्पहार अर्पण करून मोर्च्याची सुरवात करण्यात आली. यावेळी    तालुकाध्यक्ष नितीन यादव,दादा जाधव, रवींद्र घाडगे, प्रमोद गाडे,सचिन खानविलकर,शकिल शेख,किरण भोसले,निलेश भोसले,राजेंद्र धनसिंग भोसले,दादा गायकवाड उपस्थित होते.

    गेल्या वर्षी गाळप झालेल्या ऊसाचे अंतिम बिल श्री दत्त इंडिया साखर कारखान्याने  ३४११ प्रती टन ऊस दर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दसऱ्यापर्यंत जमा करून, शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच  फलटण तालुक्यातील शेतकरी वर्षोनुवर्षे इतर शेजारील कारखान्याच्या तुलनेत कमी ऊस दर घेत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे व पाऊस न झाल्यामुळे अडचणीत आला आहे. त्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी दत्त इंडिया शुगर कारखान्याने माळेगाव कारखान्या इतका ऊसदर जाहीर करावा. अन्यथा दसऱ्या नंतर मा.खा.राजु शेट्टी जो आंदोलनाचा आदेश देतील, त्या प्रमाणे आपल्या कारखान्यावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी दिला.

    शेतकरी बांधवांनी गतवर्षी कारखान्याकडे घटकेल्या ऊसाचा दुसरा हप्ता व दर जाहीर न केल्यास, आम्ही ऊसतोड घेणार नाही आणि श्री दत्त इंडिया कारखान्यास ऊस घालणार नाही व बाहेरून येणारा  ऊसही थांबवू अशी ठाम भूमिका यावेळी घेतली. 

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मागण्यांचे निवेदन श्री दत्त इंडिया कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर अजित जगताप यांनी स्वीकारले व शेतकऱ्यांना योग्य तो दर दिला जाईल असे आश्वासन दिले.

No comments