श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली असून भविष्यात सर्वोच्च स्थानावर नेणार - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक आज आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासह सर्व नियम व निकष सांभाळून सर्व अडचणीतून बाहेर पडली असल्याने यापुढेही सर्व नियम, निकष सांभाळून बँक सर्वोच्च स्थानावर पोहोचविण्याचा निर्धार बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण समेत अध्यक्षस्थाना वरून बँकेच्या प्रगतीचा आढावा सभासदांसमोर मांडताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी श्रीमंत सईबाई महाराज सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, बुलढाणा अर्बन को - ऑप. क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन शाहूराज भोसले, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, माजी सभापती रामभाऊ ढेकळे, सुरेशभाई गांधी, प्रा. भीमदेव बुरुंगले यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते.
श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची स्थापना करण्यात आली. माजी आमदार श्रीमंत विजयसिंह मालोजीराव तथा श्रीमंत शिवाजीराजे चेअरमन आणि व्यवस्थापक म्हणून तांबे साहेब यांनी बँकेची जबाबदारी सांभाळून १४ शाखांद्वारे बँक उत्तम प्रकारे वाढविली. त्यानंतर कायद्यातील नवीन बदल आत्मसात करण्यात अवधी गेला. एन. पी. ए. मध्ये वाढ झाल्याने अडचणीत सापडलो. अगदी विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न झाले तथापि आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, बुलढाणा अर्बनचे चेअरमन राधेश्यामजी चांडक तथा भाईजी, मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ व सभासदांच्या सहकार्याने आवश्यक तरतुदी करून, आज बँक खऱ्या अर्थाने सक्षम असल्याने कृषी, उद्योग, व्यापार व अन्य कारणांसाठी कर्ज देण्यात बँक मागे राहणार नसल्याची ग्वाही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. अडचणीत असताना सर्वांनी केलेले सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
रिझर्व्ह बँकेने नेहमीच प्रत्येक बँकेपुढे त्या त्या वर्षातील उद्दिष्टे ठेवलेली असतात व ती केंव्हा, कशी पूर्ण केली हा निकष ठेवून बँकेला ऑडिट दर्जा देण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून देत आपले बँकेचे मार्गदर्शक, संचालक मंडळ आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व सहकार्यामुळे आपल्या बँकेने सर्व उद्दिष्टे पार केल्याने शासकीय लेखा परीक्षकांनी बँकेस ऑडिट वर्ग 'अ' दिला असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अभिमानाने सांगितले.
बँकेने अहवाल सालात १५४ कोटी ७२ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले असून त्यामध्ये २८ कोटी रुपयांच्या सोने तारण कर्जाचा समावेश असल्याचे निदर्शनास आणून देत ही बाब बँकेच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित व नियमित व्याज देणारी आहे. जास्तीत जास्त सभासदांनी अशा योजनांमध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन करताना बँकेकडे मार्च २०२२ मध्ये २६१ कोटी ७३ लाख २४ हजार रुपयांच्या ठेवी होत्या. अहवाल सालात त्यामध्ये १२ कोटी ११ लाख ४८ हजार रुपयांची वाढ होऊन मार्च २०२३ मध्ये २७३ कोटी ८४ लाख ७२ हजार रुपयांच्या ठेवी असून अहवाल सालअखेर बँकेस ८३ लाख रुपये नफा झाला आहे. सप्टेंबर अखेर २ कोटी २५ लाख रुपये नफा झाल्याची आणि मार्च २०२४ अखेर बँकेला दोन ते अडीच कोटी रुपये नफा होईल अशी अपेक्षा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केली.
देशातील ५५० म्हणजे सुमारे ७२ टक्के बँकांवर रिझर्व्ह बँकेने लक्ष वेधले असताना आपली बँक सर्व नियम, निकष पूर्ण करून सर्वार्थाने सक्षम असल्याची ग्वाही देत बँकेचे चेअरमन, संचालक, कर्मचारी यांनी मेहनत घेऊन सर्व नियम, निकषानुसार कामकाज चालविल्याने हे शक्य झाल्याचे नमूद करत नफा मिळविणे सोपे पण तो कायम ठेवून त्यामध्ये वाढ करणे अवघड आहे. तथापि ग्राहकांप्रती निष्ठा असल्याने नजीकच्या काळात कोणताही धोका निर्माण होणार नसल्याची ग्वाही बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांनी दिली.
आ. दीपक चव्हाण यांनी बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व सभासदांच्या एकवाक्यतेमुळे बँक संकटातून बाहेर पडून खऱ्या अर्थाने सक्षम झाल्याचे सांगत सर्वांना धन्यवाद देत अभिनंदन केले.
प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लढ्ढा यांनी स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात वार्षिक सर्वसाधारण सभेविषयी विवेचन केले. त्यानंतर विषयपत्रिकेचे वाचन केले आणि त्यावरील एकेक विषय सभेसमोर ठेवून त्यावर साधकबाधक चर्चा झाल्यानंतर सर्व विषय एकमताने संमत करण्यात आले. संचालक प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी आभार मानले.
No comments