खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून क्रीडा संकुलांची कामे करावीत – क्रीडा मंत्री संजय बनसोडे
मुंबई - ‘राज्य शासनाच्या निधीतून क्रीडा संकुलासह क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देताना खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून क्रीडा संकुलांची कामे करावीत, अशा सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.
सह्याद्री राज्य अतिथीगृहात राज्य क्रीडा विकास समितीची बैठक संपन्न झाली, याप्रसंगी मंत्री बोलत होते. यावेळी विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे, उपसचिव सुनील हांजे, उपसचिव बी. आर माळी, उपसचिव अजित देशमुख, उपसचिव सुशिला पवार यांच्यासह वित्त, महसूल व क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेळास व खेळाडूंना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. राज्यात खेळाच्या पुरेशा सुविधा निर्माण करण्यासाठी क्रीडा विभागाने पुढाकार घेतला आहे.
प्रशिक्षण, खेळाच्या दर्जात सुधारणा, खेळाडूंचा गौरव, दर्जेदार क्रीडा सुविधा या बाबी केंद्रबिंदू मानून खेळाडूंसाठी हिताच्या योजना राबविण्यात येणार आहेत. क्रीडा क्षेत्रात राज्य अग्रस्थानी रहावे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी प्रस्तावित विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलास राज्य क्रीडा विकास समितीने प्रशासकीय मान्यता दिली.
No comments