मराठा आरक्षण मागणीसाठी फलटणमध्ये कडकडीत बंद
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३१ : आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाने राज्यात आक्रमक स्वरुप धारण केले आहे. आज सातारा जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास फलटण शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी, लघु व्यावसायिक, हातगाडीधारक, भाजीपाला विक्रेते, टपरीधारक, माल वाहतुक वाहने, प्रवाशी वाहतुक आदींनी उत्स्फुर्तपणे आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला व मराठा आंदोलनास समर्थन दिले.
फलटण बस आगाराच्या सर्व बसेस डेपोमध्ये लावण्यात आल्या. यावेळी प्रवाशी व एसटी बसेस अभावी फलटण बस स्थानकात शुकशुकाट होता. शहरातील महात्मा फुले चौक, स्व. अशोकराव भोईटे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रविवार पेठ, बारामती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, क्रांतीसिंह नाना पाटील चौक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, डी एड कॉलेज चौक, गिरवी नाका, गजानन चौक, पाचबत्ती चौक, आद्य कांतीविर उमाजी नाईक चौक या परिसरातील दुकाने व व्यवहार बंद होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी फलटण येथे सुरु असलेल्या साखळी उपोषणाच्याबरोबरीने आमरण उपोषणासही प्रारंभ झाला असून, आज आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मराठा आंदोलनास फलटण शहर व तालुक्यातून पाठिंबा वाढत असून, विविध संघटना, संस्था, सामाजिक कार्यकर्ते व संघटना आपला पाठिंबा व्यक्त करत आहेत.
No comments