पाय काढण्याची भाषा खपवून घेणार नाही - खा. रणजितसिंह ; श्रीमंत रामराजेंना नेमकं खुपतय काय? - खा. रणजितसिंह यांचा खोचक सवाल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ - श्रीराम सहकारी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांचे पाय काढण्याची भाषा केली, मी कधीही श्रीराम कारखान्याच्या कारभारावर काही बोललो नाही, ना कधी श्रीराम कारखान्याबाबत राजकारण केले, सहकारात राजकारण नको म्हणून आम्ही त्यावर बोलणे टाळले होते. श्रीराम साखर कारखाना ही शेतकऱ्यांची संस्था आहे, आणि शेतकऱ्यांच्याच पोरांचे पाय काढण्याची भाषा करत असाल आणि आम्ही ते खपवून घेऊ, अशी अपेक्षा करत असाल तर असे मुळीच होणार नाही, आणि ते सहनही केले जाणार नाही. मी कोणाला बोलत नाही पण मला कोणी बोललं तर त्याला मी सोडतही नाही, हेही रामराजे यांनी लक्षात ठेवावे. तुम्ही माझे सहकारी विश्वासराव भोसले यांचा पाय काढण्याची भाषा केली ती चुकीचा आहे, तुमच्यात हिम्मत असेल तर त्यांच्या केसाला धक्का लावून दाखवा, म्हणजे तुम्हाला कळेल की फलटणची जनता रौद्ररूप कसे धारण करतेय ते, असा इशारा खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला.
खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर हे पत्रकार परिषदेत बोलत होते, याप्रसंगी प्रल्हादराव साळुंखे पाटील, धनंजय साळुंखे पाटील, जयकुमार शिंदे, अशोकराव जाधव, सचिन कांबळे पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार रणजीतसिंह म्हणाले की, स्वतः कारखाना चालवण्यासाठी दुसऱ्याच्या कुबड्या घ्यायच्या, कारखाने दुसऱ्याला चालवायला द्यायचे, गेले पंधरा वर्षे श्रीराम कारखान्याचा हिशोब नाही, जमीन विकल्यानंतर कारखान्यावर किती लोन आहे ते देखील माहित नाही, कारखान्याला मिळणारे उत्पन्न त्याचा देखील भोंगळ कारभार आहे, वास्तविक श्रीराम कारखाना चालवायला दिला तर वर्षाला त्याला बारा ते तेरा कोटी रुपये मिळाले पाहिजेत, परंतु त्या कारखान्याला पहिल्यांदा दहा कोटी ठरलं, नंतर पाच कोटी आणि आता तर ५० लाख रुपयांमध्ये कारखाना चालवायला दिला आहे, एखादा पेट्रोल पंप देखील जास्त पैशात चालवायला देत असतात. यामध्ये पैशाचा भ्रष्टाचार होत आहे हे न कळायला आम्ही दुधखुळे नाही. शेतकऱ्यांनी ऊसदरा विषय बोलणे, किंवा ऊस दर वाढवून मागणे, हा त्यांचा हक्क आहे, कारण तो त्यांच्या मालकीचा कारखाना आहे हा रामराजेंच्या मालकीचा कारखाना नाही असे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
खा.रणजितसिंह पुढे म्हणाले की, स्वराज कारखान्यावर तर बोलण्याचा तुम्हाला मुळीच अधिकार नाही, कारण स्वराज कारखाना, श्रीराम कारखान्यापेक्षा जास्त दर देत आलेला आहे, आम्ही मोठ्या ताकतीने, हिंमतीने कारखाने उभे केले आहेत, कोणतीही राजकीय ताकद नसताना आम्ही ते उभे केलेले आहेत आणि ते चालवले आहेत. आज फलटण तालुक्यातील सर्वात मोठा कारखाना हा स्वराज कारखाना आहे, देशामधील सर्वात मोठा डीसलेरी प्रकल्प हा स्वराज कारखान्याचा आहे आणि दरही स्वराज सर्वात जास्त देत आहे. रामराजेंना नेमकं खुपतंय काय? ते मला समजत नाही, तुम्हाला बँक चालवता आली नाही, ती बुलढाणा अर्बनला चालवण्यास दिली. दूध संघ बंद पाडला, खरेदी-विक्री संघ बंद पाडला, साखरवाडी कारखान्याचे वाटोळे केलं, तासगावकर कारखाना काढत होते तर त्याला कारखाना काढू दिली नाही, त्यामुळे तुम्हाला नेमकं खुपतंय काय? असा खोचक सवाल करून, आम्ही करतोय ते करू द्यायचं नाही, स्वराज बाबतीत देखील पाठीमागे प्रांत अधिकाऱ्यांना हाताशी धरून, कारखाना बंद करण्याच्या उलाढाली केल्या, माझ्या विरोधात अनेक राजकीय षडयंत्र केली, मी अजिबात त्यांना भीत नाही, माझ्या विरुद्ध षडयंत्र जे करतात ते सर्वसामान्य माणसाला चालतील असे नाही, या तालुक्यासाठी मी तीन ते चार वर्ष भरीव योगदान दिलेला आहे, निरा देवघर, धोम बलकवडीची कामे सुरू केलेली आहेत, फलटण बारामती रेल्वेचे काम चालू आहे, फलटण पुणे रेल्वे चालू झालेली आहे, फलटण बारामती रस्त्याचे काम चालू आहे, पुणे पंढरपूर रस्त्याचे काम संपत आलेले आहे,फलटण आदरकी मार्गाचे काम संपत आलेले आहे, शेकडो कोटीची कामे या तालुक्यासाठी आणलेली आहेत, तुमच्या जर हिम्मत होती तर तुम्ही सर्व कामे करून दाखवायची होती, तुमच्याकडे मंत्रीपद होतं, तरी तुम्ही काम केले नाहीत असा सवाल खा रणजितसिंह यांनी केला.
No comments