ट्रक पळवून नेताना मालकाला चिरडले, आर्थिक व्यवहारातून घडला प्रकार
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) - आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादात मालट्रक पळवून नेताना ट्रक मालकालाच चिरडण्यात आले. हा धक्कादायक प्रकार मलकापूर (ता. कराड) येथे घडला. विष्णू शिवाजी हजारे (वय ३५, रा. अहिल्यानगर, मलकापूर, ता. कराड ) असे ठार झालेल्या ट्रकमालकाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय संजय गावडे (वय २७, रा. रेठरे, ता. कराड ) याच्यावर कराड शहर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मलकापुरातील हॉटेल गंधर्व पॅलेस शेजारी विष्णू हजारे यांचे जयहिंद मोटर गॅरेज आहे. हजारे यांनी गॅरेज व्यवसाय करत करत काही महिन्यांपूर्वी ट्रक विकत घेतला होता. दुपारी ट्रक गेरेजशेजारी उभा करून ते गॅरेजमधील काम करत होते. यावेळी ट्रकच्या व्यवहारातील रक्कम मागण्यासाठी अक्षय गावडे याच्यासह चार ते पाच जण हजारे यांच्या गॅरेजमध्ये आले. त्यांच्यात आर्थिक देवाण-घेवाणीवरून बाचाबाची झाली. यावेळी अक्षय गावडे याने 'पैसे दे, अन्यथा ट्रक घेऊन जातो," असे म्हणत ट्रक (एम.एच. १०, ए. डब्ल्यू. ७५७४) मध्ये बसून त्याने ट्रक सुरू केला.
तेव्हा 'कसा नेतोय बघू, म्हणत त्याला अडवत हजारे केबिनमध्ये चढले. सुरू झालेला ट्रक बंद करण्यासाठी ते प्रयत्न करत असतानाच तोल जाऊन हजारे खाली पडले. याचवेळी गावडेने ट्रक सुरू करून पळून जाताना हजारेंच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. ट्रक घेऊन पसार झालेल्या अक्षय गावडेला नागरिकांनी पकडून ठेवले.
No comments