व्यापारी - सर्वसामान्यांना कोणी त्रास दिल्यास त्याची गय केली जाणार नाही खा. रणजितसिंह
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ९ - व्यापाऱ्यांवर कोयता हल्ला झाला, तो प्रकार भयावह आहे, या लोकांचा पोलिसांनी बंदोबस्त केला असून त्यांच्यावर व कडक कारवाई होईलच, पण या पुढे कोणी व्यापारी किंवा सर्वसामान्य माणसांना कोणी त्रास दिल्यास त्याची गय केली जाणार नाही असा इशारा खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला.
फलटण येथील व्यापाऱ्यांवर दोघा माथेफिरूंनी कोयता हल्ला करून पैसे लुटले मात्र पोलिसांनी लगेच त्या दोघांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना धीर देण्यासाठी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दि. ८ ऑक्टोबर रोजी बाजारपेठेत भेटी देऊन पीडित कुटुंबाचीही भेट घेतली.
फलटण नगरपरिषदेच्या जागेत हे लोक दारू पिणे, गांजा ओढणे असे गैरप्रकार करतात. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी यांना या जागा शटर लावून बंद करण्याच्या स्पष्ट सूचना यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्या आहेत.
पोलीस व इतर अधिकाऱ्यांना अशा घटना या पुढे घडू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना खासदारांनी दिल्या. यावेळी अशोकराव जाधव, जाकीरभाई मणेर, वसीम मणेर, राजेंद्र हेंद्रे यांच्यासह अन्य पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते.
सुपर मार्केटमध्ये हे माथेफिरू दारू पिणे, गांजा ओढणे तसेच शिवीगाळ करीत असून दहशत निर्माण करत असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली.
मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांना अनेकजण नाहक त्रास देत असून, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवून तसेच रात्रीच्या वेळी बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली असता खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून यापुढे व्यापाऱ्यांना योग्य ते संरक्षण देण्यात यावे अशा सूचना देत पीडित व्यापारी कुटुंबाला मानसिक आधार देत आपण तुमच्याबरोबर असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
No comments