दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ ठार तर १ जखमी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : फलटण शिंगणापूर मार्गावर मिरढे ता. फलटण गावच्या हद्दीत दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. बाळू कोंडीबा हाके वय ६० रा. मिरढे ता. फलटण असे अपघातात मृत्यू पावलेल्याचे नाव आहे.
या प्रकरणी सागर रुपनवर रा. शिंगणापूर ता. माण याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवार दि. २४ आक्टोंबर रोजी सायंकाळी पावने सातच्या सुमारास मिरढे गावच्या बसस्टॉप जवळ फलाटणहून मिरढेकडे एमएच ११ सीवाय ०९३८ या मोटरसायकलवरुन येत असलेल्या बाळू हाके यांना शिंगणापूरकडून फलटणकडे निघालेल्या विना नंबर प्लेटच्या मोटारसायकलहून भरधाव वेगाने आलेल्या सागर रुपनवर याने विरुध्द बाजूस जावून समोरुन धडक दिली. या अपघातात बाळू कोंडीबा हाके यांचा मृत्यू झाला असून सागर रुपनवर हा जखमी झाला आहे. या अपघाताप्रकरणी रुपनवर याच्यावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद भीमराव सिद्धू कचरे रा. मिरढे ता. फलटण यांनी दिली असुन तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नवनाथ रानगट करीत आहेत.
No comments