Breaking News

मराठा आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत कुठलेही राजकीय कार्यक्रम स्वीकारणार नाही - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

will not accept any political program till Maratha reservation is decided - MP. Ranjitsingh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत, जनतेचेच नाही तर माझेही  राजकीय कार्यक्रम, मी स्वीकारणार  नसल्याचे  खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट करतानाच, या विषयावर राज्य सरकारने आश्वासक पद्धतीची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मराठा आंदोलकांची सहनशक्ती तुटण्या अगोदर केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी एकत्र येऊन, आरक्षणावर मार्ग काढावा, त्यादृष्टीने आमच्या हालचाली चालू असून, माझी येथे येण्या मागची भूमिका देखील तीच आहे. इथे येऊन, तुमच्याबरोबर आहोत, हे सांगण्यापेक्षा, तुमच्यासाठी पाऊले टाकायला मी कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी आंदोलकांना दिला.

    फलटण येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु असलेल्या मराठा समाजाच्या साखळी उपोषणाबरोबरीने आज पासुन आमरण उपोषणासही प्रारंभ करण्यात आला आहे. आंदोलनस्थळी आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट दिली. याप्रसंगी खा. रणजितसिंह बोलत होते.

    मराठा आरक्षणाबाबत बोलताना खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, मराठा समाजाला राजकारणात आरक्षण नकोय तर ते शिक्षणात आरक्षण हवे आहे, पुढच्या पिढीसाठी शिक्षणात आरक्षण हे महत्त्वाचे आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला आहे, त्यावर तातडीने मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.  सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकषाच्या आधारे, मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण, देण्याबाबतची राज्य सरकारची भूमिका आहे. 

    मराठा समाजाचे हे आंदोलन पुढे वाढू नये, यासाठी आम्ही काही खासदार मिळून मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहोत. आणि त्या संदर्भात चर्चा करणार आहे.

    राज्य सरकार कात्रीत सापडले आहे, घटनाबाह्य आरक्षण दिले तर ते टिकणार नाही आणि घटनेत बसवण्यासाठी जे निकष आहे ते पूर्ण करायचे म्हटले तर तेवढा वेळ सरकारकडे नाही, मराठा समाजाला काही करून, आरक्षण द्यावे ही भावना मराठा आंदोलकांची आहे, जरांगे पाटील यांचे उपोषण व त्यांची खालावत असलेली तब्येत आणि आंदोलनाला महाराष्ट्रातून मिळणारा पाठिंबा पाहता, महाराष्ट्रातील  सर्वसामान्य जनतेचे रक्त, जरांगे पाटलांच्या धमन्यातून वाहत असल्याचे वाटायला लागले आहे, आज प्रत्येक मराठा आंदोलक हा जरांगे पाटील झाल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचे प्रतिपादन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

No comments