जिंती येथे २५ ब्रास माती उत्खनन ; जेसीबी जप्त
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण महसूल आणि पोलिस विभागाने मध्यरात्री जिंती तालुका फलटण येथे केलेल्या गौण खनिज उत्खनन कारवाईत जेसीबी जप्त केला असून, याप्रकरणी २ अज्ञात इसमांच्या विरोधात गौण खनिज चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १७ नोव्हेंबर २२०३ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास मौजे जिंती ता. फलटण येथील गायरान जमीन गट नंबर १०९२ येथे मातीचे उत्खनन चालू आहे अशी माहिती मिळाल्याने, फलटण तहसीलदार अभिजीत जाधव, मंडल अधिकारी राहुल खाडे, तलाठी योगेश धेंडे, तलाठी प्रकाश फडतरे, चालक भिसे असे गौण खनिज पथक जिंती येथे रात्री एक वाजण्याच्या दरम्यान गेले, पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली परंतु तेथे कोणत्याही प्रकारचे वाहने मिळून आली नाहीत, मात्र नदीपात्राच्या जवळच एक वस्ती असून, सदर ठिकाणी जेसीबी क्रमांक एम एच १२ बीबी २९ (खाडाखोड केलेले नंबर असलेला) पिवळ्या रंगाचा अंदाजे ४ लाख रुपये किंमतीचा जेसीबी हा तिथे लावलेला होता. सदर ठिकाणी गौण खनिज पथकास पाहताच, एक डंपर तेथून जोरात निघून गेला, नंतर गौण खनिज पथकाने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मदत मागून घेतली, यावेळी पोलीस हवलदार माने, चालक पोलीस हवालदार रणपिसे असे सहकारी वाहनासह जिंती येथे हजर झाले. त्यानंतर गौण खनिज पथक व पोलिसांनी कारवाई करून, जेसीबी जप्त केला व तो फलटण शहर पोलीस स्टेशनच्या आवारात उभा केला.
घटनास्थळावर पाहणी केली असता, सदर ठिकाणी अज्ञात जेसीबी चालक व डंपर चालक यांनी शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गौण खनिज उत्खनन करून पर्यावरणाचा ऱ्हास होईल अशा पद्धतीने, २५ हजार रुपये किंमतीची २५ ब्रास माती उत्खनन करून चोरून नेली. याप्रकरणी अज्ञात जेसीबी चालक व डंपर चालक यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
No comments