Breaking News

फलटण तालुक्यात प्रत्येक गावात साखळी उपोषण - मराठा क्रांती मोर्चा

Chain hunger strike in every village in Phaltan taluka - Maratha Kranti Morcha

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार १ डिसेंबर पासून फलटण तालुक्यातील प्रत्येक गावात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी साखळी उपोषण सुरू होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा फलटण च्या समन्वयकांनी दिली असून या बाबतचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात येणार आहे.

    मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबर ची मुदत दिली असून, त्या अनुषंगाने सरकारला त्याची आठवण करून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात गावागावात आरक्षण मागणीसाठी गावातील सार्वजनिक ठिकाणी मराठा समाजाने साखळी उपोषणाला बसावे असे जरांगे पाटील यांनी सांगितले असून, त्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी येथील महाराजा मंगल कार्यालयात फलटण तालुक्यातील सर्व मराठा समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आली होती,या मध्ये सर्वानुमते प्रत्येक समन्वयकांनी आपापल्या गावात तातडीने संपर्क करून आपल्या भविष्यातील पिढीसाठी एकजूट राखून आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी हे साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    दरम्यान मराठा समाज हा आपल्या ओबीसीतून व ५० टक्केच्या आतील आरक्षणाची मागणी करण्यात आली असल्याने, गावागावात राजकारण विरहित एकवटला जात असून, त्यामुळे, आता नाहीतर कधीच नाही ही ठाम भूमिका स्पष्ट करीत, या आरक्षणाच्या लढाईत पुढे येत असून १ डिसेंबर आजपासून आरक्षणाचा मागणीसाठी साखळी उपोषण करणार आहेत.

    १३ डिसेंबर रोजी प्रभू श्रीराम यात्रा असल्याने, फलटण शहरातील साखळी उपोषण हे १४ डिसेंबर पासून सुरू होणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चा फलटण च्या वतीने जाहीर केले आहे.

No comments