चौधरवाडी येथील शेतकऱ्यांचे साखळी उपोषण स्थगित
फलटण- (गंधवार्ता वृत्तसेवा) - आळंदी - पंढरपूर या नव्याने तयार होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर फलटण तालुक्यातील चौधरवाडी हे गाव लागते. या गावातील होळकर वस्ती सर्वे नं ३६ व ३६ ब ला सर्वीस रोड मिळावा, यासाठी दि. ३० ऑक्टोबर २०२३ पासून ॲड. कांचनकन्होजा खरात यांच्या पुढाकाराने होळकर वस्ती येथील शेतकरी,ग्रामस्थ प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर साखळी उपोषणाला बसले होते. सलग १२ दिवस या ठिकाणी उपोषण चालू होते. या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांनी भेट देऊन पर्यायी मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे साखळी उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
चौधरवाडी (होळकर वस्ती, पाच मोरी) ला जाणारा सध्या चालू असलेला वाहतुकीचा रस्ता पर्यायी मार्ग तयार होईपर्यंत बंद करणार नसल्याचे देखील कळवण्यात आले आहे. मात्र, दि. ३ डिसेंबर २०२३ पर्यंत यावर योग्य निर्णय न झाल्यास शेतकरी पुन्हा साखळी उपोषणाला बसतील असे ॲड. कांचनकन्होजा खरात यांनी सांगितले आहे.
१२ दिवस चाललेल्या शेतकऱ्यांच्या साखळी उपोषणात भगवान होळकर, नवनाथ करचे, युसुफ शेख, बापू होळकर, बाळू खांडेकर, महादेव होळकर, प्रदिप होळकर, मोनाली होळकर, शोभा होळकर, अर्चना होळकर, किरण होळकर, राखी शोभा होळकर, सुरेखा भोसले, अक्षय करचे, छबुबाई करचे, संतोष होळकर, मंगेश होळकर आदी शेतकरी सहभागी झाले होते.
No comments