Breaking News

यांत्रिक शेतीमुळे लोहार, सुतार या दोन्ही ग्रामीण कारागीरांसह सर्व बलुतेदारांवर उपासमारीची वेळ : शासनाने कुटीरोद्योगाद्वारे ह्या कुटुंबांना संधी द्यावी : अरविंद मेहता*

Due to mechanized agriculture, the blacksmiths, carpenters and all the rural artisans are facing starvation time: Govt should give opportunity to these families through cottage industry: Arvind Mehta

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)   - : महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण संस्कृतीमध्ये लोहार, सुतार, चांभार, कुंभार, परिट, न्हावी वगैरे १२ बलुतेदारांना अनन्य साधारण महत्व होते, प्रामुख्याने सुतार व लोहार यांच्याशिवाय शेतीची कामे होत नसत, अलीकडे यांत्रिक शेतीमुळे या दोन्ही ग्रामीण करागीरांसह सर्व बलुतेदारांवर उपासमारीची वेळ आली असताना शासनाने कुटीरोद्योग उभारुन ह्या कुटुंबांना त्यामध्ये संधी दिली पाहिजे अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी व्यक्त केली आहे.

    सकल लोहार समाज विकास मंच सातारा, कोळकी, ता. फलटणच्या माध्यमातून साप्ताहिक लोहसंस्कार १० वा वर्धापन दिन, गुणवंत विद्यार्थी सत्कार, समाजभूषण पुरस्कार वितरण, राज्यस्तरीय वधू - वर पालक परिचय मेळावा आणि लोहसंस्कार दिवाळी विशेषांक प्रकाशन अशा संयुक्त कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन अरविंद मेहता बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, सातारा जिल्हा परिषद माजी सदस्य विश्वासराव गावडे, फलटण पंचायत समिती माजी सदस्य सचिन रणवरे, प्रा. शिक्षक सहकारी बँक माजी व्हा. चेअरमन व विद्यमान संचालक शशिकांत सोनवलकर, कोळकी ग्रामपंचायत सरपंच सौ. सपना कोरडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

    महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले सुमारे ८०० ते ९०० स्त्री - पुरुष समाजबांधव आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

    लोहार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासनात दाखल झालेल्या तरुणांच्या सत्करावरुन या समाजात गुणवत्तेची कमतरता नसल्याचे स्पष्ट होत असल्याने शासनाने समाजाच्या मागणीप्रमाणे त्यांना एस. टी. आरक्षण देवून समाज व कौटुंबिक विकासाची संधी दिली पाहिजे अशी अपेक्षा अरविंद मेहता यांनी व्यक्त केली.

    समाजभूषण पुरस्काराच्या माध्यमातून समाजात उत्तम काम करणारी, समाजासाठी काही तरी केले पाहिजे या भावनेने प्रयत्नशील असलेल्या व्यक्तिमत्वांची ओळख समाजाला नव्याने झाली असून विविध क्षेत्रात या मंडळींनी केलेल्या कामाची माहिती घेऊन, नव्या पिढीने त्यांचे आदर्श घेऊन समाज विकासात योगदान द्यावे अशी अपेक्षा अरविंद मेहता यांनी व्यक्त केली.

    एक आदर्श माध्यमिक शिक्षक म्हणून एच. आर. चव्हाण सरांनी या भागातील २ पिढ्या सुसंस्कृत व स्वाभिमानी घडविल्या असल्याचे नमूद करीत आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाची संधी केवळ २ वर्षे घेता आल्याचे निदर्शनास आणून देत त्या २ वर्षातील संस्कार आपले जीवनाला कलाटणी देणारे ठरल्याचे आवर्जून सांगत आता सेवानिवृत्ती नंतरही सरांनी आपले काम सुरु ठेवल्याबद्दल माणिकराव सोनवलकर यांनी सरांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

    शशिकांत सोनवलकर यांनी एच. आर. चव्हाण सर आणि कुटुंबीयांनी समाज हिताला प्राधान्य देवून सकल लोहार समाज विकास मंच आणि साप्ताहिक लोहसंस्कारच्या माध्यमातून गेल्या ९ वर्षात केलेल्या समाज कार्याचा आढावा घेत चव्हाण कुटुंबीयांचे कौतुक केले.

    वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ, नागपुरचे सचिव सुरेश अर्जुन मांडवगडे यांचे समाजभूषण पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना समयोचीत भाषण झाले.

    प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर एच. आर. चव्हाण सर यांनी प्रास्ताविकात विविध उपक्रमांद्वारे केलेल्या समाज हिताच्या कामांचा आढावा घेत त्यामध्ये संघटनेचे पदाधिकारी, समाज बांधव आणि कुटुंबीयांनी केलेल्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला.

    समाजाची आजची अवस्था व आवश्यकता याविषयी मत मांडले, तसेच गेल्या ९ वर्षामध्ये केलेल्या कार्याचा आढावा घेतला. कोरोना महामारी, पुरग्रस्त समाज बांधवांना संघटनेच्या माध्यमातून केलेल्या आर्थिक व अन्य मदत केल्याचे सांगितले.

    सा. लोहसंस्कारच्या माध्यमातून समाजाच्या व्यथा मांडल्या. तसेच फलटण तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये स्थानिक विकास निधीतून लोहार समाज सभागृह बांधून द्यावे अशी मागणी केली.

    लोहसंस्कार साप्ताहिकामधून इच्छुक वधू - वरांची माहिती तसेच समाजाच्या व्यथा वेदना त्याबाबत संघटनेच्या माध्यमातून शासन प्रशासन स्तरावर केलेला पाठपुरावा, समाजातील काही कार्यक्रम, उपक्रमाची माहिती दिली जात असल्याने समाज बांधवांसाठी हा अंक उपयुक्त असल्याने सर्वांनी केवळ २५० रुपये वार्षिक वर्गणी भरुन लोहसंस्कार साप्ताहिकाचा अंक नियमित घरपोच मिळण्यासाठी प्राधान्य द्यावे असे आवाहन उपस्थितांना केले.

    या कार्यक्रमात वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ, नागपुरचे सचिव सुरेश अर्जुन मांडवगडे, अर्जुन दत्तात्रय टिंगरे महुद, उद्योजक रमेश सदाशिव पवार पिंपोडे बुद्रुक, समाजसेविका सौ. सुमन धनाजीराव वसव गोंदवले बुद्रुक यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पहार  असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

    स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासनात दाखल झालेले समाजातील तरुण/तरुणी, इयत्ता १० वी आणि १२ वी मध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी यांचा सन्मान करणेत आला, तसेच ७५ % च्या वर गुण संपादन केलेल्या इयत्ता १० वी च्या २७ आणि  इयत्ता १२ वी च्या ४ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.

    भोजनोत्तर दुसऱ्या सत्रात वधू - वर पालक परिचय मेळावा संपन्न झाला, त्यामध्ये सुमारे ८५ ते ९० वधू - वरांची नोंदणी झाली. यावेळी बऱ्याच मुला - मुलींनी आपला परिचय करुन दिला.

    प्रशांत चव्हाण सर, सौ. वनिता हरिहर व प्रतिभा पोपळघट यांनी सुत्रसंचालन केले. बाळासाहेब वसव सर यांनी समारोप व आभार मानले.

No comments