प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडून मतदार यादीचा हाऊस हाऊस सर्वे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण विधानसभा मतदारसंघातील वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांनी मतदार यादीत आपल्या नावाची नोंदणी करावी आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन प्रांताधिकारी तथा फलटण (अ. जा.) विधानसभा मतदारसंघ मतदान नोंदणी अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. दरम्यान प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी फलटण तालुक्यातील झडकबाईचीवाडी येथे मतदार यादीचा हाऊस टू हाऊस सर्व्हे केला व स्वतः नवीन मतदारांची नोंदणी केली.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या दि. १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये दि. १ जानेवारी २०२४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत किंवा तत्पूर्वीच पूर्ण केली अशा सर्व मतदारांनी फॉर्म क्रमांक ६ भरून आपल्या नावाची नोंदणी मतदार यादीत करावी. या नाव नोंदणीसाठी बी.एल.ओ., बी.एल.ए. यांच्या माध्यमातून अथवा व्होटर अॅपद्वारे मतदार नाव नोंदणी करता येणार असल्याचे निदर्शनास आणून देत जास्तीत जास्त नव मतदारांनी आपल्या नावाची नोंदणी या मतदार यादीमध्ये करावी असे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
मतदार मयत झाले आहेत परंतु त्यांची नोंद अद्याप मतदार यादीत आहे अशा मतदारांच्या कुटुंबीयांनी फॉर्म क्रमांक ७ भरून त्या नावांची वगळणी मतदार यादीतून करावी. त्यावेळी सोबत मृत्यूचा दाखला अथवा ग्रामसेवकांनी प्रमाणित केलेली यादी यापैकी काही एक जोडावे व कार्यालयामध्ये जमा करावे अशी सूचना प्रांताधिकाऱ्यांनी केली आहे.
मतदार यादीतील ज्या मतदारांना आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख, फोटो यामध्ये बदल करून घ्यायचा आहे अशा मतदारांनी फॉर्म नंबर ८ भरून मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा. त्यामुळे सदर मतदारांना अपेक्षित बदल येत्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मतदान यादीमध्ये होतील. आगामी निवडणुकांपूर्वी आपल्या नावाची नोंदणी योग्य पद्धतीने मतदार यादीमध्ये करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. या पालन करून भारतीय लोकशाहीने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची संधी प्राप्त करून घ्यावी असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय व मतदान नोंदणी अधिकारी कार्यालय, फलटण यांच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments