मराठा आरक्षण आंदोलन : महिलांनी दिला सरकारला बांगड्याचा आहेर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने फलटण येथे सुरू असलेल्या साखळी व आमरण उपोषण आंदोलन स्थळी, आज आंदोलनाच्या ९ व्या दिवशी, आंदोलनामध्ये महिलांनी सहभाग नोंदवत, जोरदार घोषणाबाजी करत, आरक्षण द्या! अन्यथा बांगड्यांचा आहेर स्वीकारावा असे सरकारला ठणकावून सांगितले. यावेळी सरकारला प्रातिनिधिक स्वरूपात बांगड्यांची आहेर दिला.
महिलांनी यावेळी आरक्षणासंदर्भातील आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. आम्हाला आरक्षण द्या, नाहीतर सरकारने बांगड्या भराव्यात! असे ठणकावून सांगतानाच सरकारने मराठा समाजास आरक्षण द्यावे अन्यथा आम्ही महिला हातात बांगड्या घालणार नाही, मात्र सरकारला बांगड्या भरणार. बाकीच्या समजला आरक्षण आहे, मग आमच्या मराठ्यांच्या मुलांनी काय केले ? मराठी जातीच्या मुलांना नोकऱ्या नाहीत ,त्यांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण होतोय 40- 45 वर्षे झाली तरी लग्न होत नाहीत.जिथे तिथे आरक्षणाचा प्रश्न उभा राहतोय.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मंत्रीपदे रात्रीत बदलू शकतात तर मग आम्हाला आरक्षण का मिळू शकत नाही? जर आरक्षण द्यायचं नसेल तर ह्या बांगड्या स्वीकारा अशा प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या.
आजच्या आंदोलनामध्ये शहरासह झडकबाईचीवाडी, मानेवाडी वडजल येथील महिलांचा सहभाग होता. साखळी उपोषणाच्या बरोबरीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून उपोषण स्थळी आठ मराठी बांधव उपोषण करीत आहेत. सदर उपोषणाला बसलेल्या काही मराठा बांधवांची प्रकृती खालावली आहे. आरक्षणासाठी निंभोरे येथील अमित मधुकर रणवरे यांनी काशीदवाडी विकास सेवा सोसायटी संचालक पदाचा तसेच भाजपा सदस्य पदाचा व शक्ती प्रमुख केंद्र पदाचा राजीनामा दिला आहे.
No comments