मराठ्यांना आरक्षण मिळणारच पण गाफील राहू नका - मनोज जरांगे पाटील
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ - मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे, मात्र ते मिळू नये यासाठी वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय षडयंत्र रचले जात आहे. महाराष्ट्रामध्ये 1963 पूर्वीचे कुणबी दाखले सापडण्यास सुरुवात झाली आहे म्हणजे मराठ्यांना आरक्षण होते हे सिद्ध झालेले आहे. ते आरक्षण मिळू न देणाऱ्या राजकीय नेतृत्वाला जाब विचारण्याची वेळ आली आहे. 24 डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घ्यायचाच आहे. सकल मराठा समाजाने 70 टक्के लढाई जिंकलेलीच आहे, मात्र गाफील राहू नका संयमाने घ्या, ज्यांचे दाखले मिळाले आणि ज्यांचे दाखले मिळाले नाही, अशांमध्ये भांडण लावण्याचे उद्योग सुरू आहेत त्यामुळे मराठा समाजाने एकी दाखवून आरक्षण मिळवा आणि पुढच्या पिढ्यांचे कल्याण करा मात्र संयमाने परिस्थिती हाताळा असे कळकळीचे आवाहन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्यात केले.
मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीच्या वतीने येथील गांधी मैदानावर अवघ्या दोन दिवसाच्या मुदतीत अत्यंत चोख तयारीनिशी आशीर्वाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या आशीर्वाद सभेमध्ये तब्बल तीन तास उशिरा आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला एकी ठेवण्याचे केलेले आवाहन आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा घेतलेला परखड समाचार हे सभेचे वैशिष्ट्य ठरले.
No comments