फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचा राज्यात १९ वा व विभागात प्रथम क्रमांक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासन पणन संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडून बाळासाहेब ठाकरे, कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत केलेल्या पाहणीत कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणने संपूर्ण महाराष्ट्रातून १९ वा आणि कोल्हापूर विभाग व सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावीत बळीराजाच्या सेवेतील आपले अग्रेसरत्व अधोरेखित करीत वाहव्वा मिळविली आहे.
महाराष्ट्र शासन पणन संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे माध्यमातून बाळासाहेब ठाकरे, कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व ३०५ बाजार समित्यांचे स्टेट लेव्हल रॅकिंग नुकतेच जाहीर करणेत आले असून त्यामध्ये फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीने राज्यात १९ वा आणि कोल्हापूर विभाग व सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून टॉप २० मध्ये स्थान प्राप्त केले असलेने या बाजार समितीचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
बाळासाहेब ठाकरे, कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत स्मार्ट रॅकिंग लिस्ट तयार करताना बाजार समितीने उपलब्ध करुन दिलेल्या पायाभुत सुविधा व इतर सेवा सवलती, आर्थिक व वैधानिक कामकाज यासह अन्य कामकाज विषयक निकष विचारात घेवून सहकार व पणन विभागाकडून स्वतंत्ररित्या ऑनलाईन मुल्यांकन करुन राज्य व विभागस्तरीय रॅकिंग लिस्ट जाहीर करणेत आली असून त्यामध्ये फलटण बाजार समितीने आपले कामकाज व शेतकरी सेवेतील अव्वल स्थान सिद्ध केले आहे.
फलटण - खंडाळा तालुक्याचे माजी आमदार श्रीमंत विजयसिंह मालोजीराव नाईक निंबाळकर तथा श्रीमंत शिवाजीराजे यांची सद्शील दुरदृष्टी व लोकोद्धाराची प्रेरणा घेवून फलटण तालुक्यातील दुसऱ्या हरित क्रांतीचे जनक आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे नेतृत्व व मार्गदर्शन आणि आ. दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटण येथे शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करीत असल्याचे बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या शेती विषयक विविध समस्यांची सोडवणूक करुन शेत मालाला जास्तीत जास्त दर आणि शेतमाल आवक आणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत फलटण तालुक्यात अलिकडच्या काळात अवतरलेल्या दुसऱ्या हरितक्रांतीमुळे उत्पादीत होत असलेल्या शेत मालासाठी सक्षम अशी पणन व्यवस्था देवून फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती अधिक लोकाभिमुख व स्पर्धाक्षम करणेकरीता बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, व्हा. चेअरमन भगवानराव होळकर व संचालक मंडळ यांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी रीतीने राबविण्यात बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर व त्यांचे सहकारी अधिकारी/कर्मचारी यांनी घेतलेली मेहनत उपयुक्त व प्रेरणादायी ठरली आहे.
बाजार समिती सतत अधिक गतिमान व प्रगती पथावर नेणेसाठी उत्कृष्ट साथ दिल्याबद्दल व केलेल्या सहकार्याबद्दल सर्व शेतकरी बंधू, अडते, खरेदीदार व्यापारी, हमाल मापाडी, वाहन चालक व इतर घटक यांचे बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणच्या शेतकरी हितास्तव कामकाजामध्ये पणन मंडळाचे विभागीय उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा मनोहर माळी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, फलटण पी. एस. रोकडे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन बाजार समितीला नेहमी लाभले आहे.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हितास्तव कामकाज करत जिल्ह्यात व विभागात प्रथम क्रमांक मिळवुन स्टेट रॅकिंगमध्ये टॉप २० मध्ये स्थान प्राप्त केले असलेने श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व त्यांचे सर्व सहकारी यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments