आसू गावात रानगावा ; शेतकरी भयभीत
आसू (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - आसू ता. फलटण गावच्या हद्दीत आज सकाळी जंगली रानगव्याने धुमाकूळ घातला. रानगव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान वन विभागास रानगव्याबाबत सकाळी ११ वाजता माहिती दिली गेली होती, मात्र वनविभाग दुपारी २.३० नंतर घटनास्थळी पोहचला. तोपर्यंत रानगव्याने आसू परिसरात धुमाकूळ घातला व तो सोलापूर हद्दीत पसार झाला.
आज सकाळी बारामती हद्दीतून नीरा नदी पत्रातून रानगव्याने फलटण तालुक्याच्या आसू गावात प्रवेश केला, सकाळी ठीक १० वाजता आसु गावाततील अनेक शेतांमध्ये त्याने धुमाकूळ घातला होता, त्या रानगव्याने अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये जात धिंगाणा घातला, परंतु जागरूक शेतकऱ्यांनी त्याला हुसकावले त्या रानगव्याची पळण्याची गती इतकी होती की समोरच्याला सुद्धा भीती वाटत होती.
आसू गावचे पोलीस पाटील अशोक गोडसे यांनी संबंधित वन विभागाला ही माहिती ११ वाजता कळवली, परंतु वनविभागाचे अधिकारी लवकर घटनास्थळी आले नाहीत, आसू येथील माळीमळा नावाच्या शिवारात रानगव्याने काही वेळ दहशत माजवत, तो सातारा जिल्ह्याची हद्द सोडून माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत पोहोचल्यानंतर अडीचच्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले, तोपर्यंत रानगावा माळशिरस तालुक्याच्या हद्दीत पोहोचला होता.
सध्या कॅनलला पाणी आल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये काम करत आहेत, या भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने, अनेक शेतकरी पाणी देण्यासाठी शेतामध्ये थांबत आहेत, आज सकाळी रान गवा आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरतात अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था व घबराट निर्माण झाली होती.
आसू परिसरातून रानगव्याबाबत अनेकांनी फोन करूनही वनविभागाचे कर्मचारी वेळेत पोहोचले नाहीत. आसू गावचे पोलीस पाटील अशोक गोडसे यांनी ११ वाजता ही बाब त्यांना सांगूनही ते अधिकारी चक्क तीनच्या सुमारास घटनास्थळी पोहचले, तोपर्यंत रानगवा दुसऱ्या हद्दीत प्रवेश करून पसार झाला होता. शेतकरी मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्याकडे डोळे लावून बसले होते की, आता वनविभागाचे अधिकारी येथील आणि रानगव्याचा बंदोबस्त करतील, मात्र वन विभाग वेळेत काही पोहोचला नाही, रानगाव्याने सगळीकडे धुमाकूळ घालत शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करून सोलापूर हद्दीत निघून गेला.
No comments